शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

जलसंचयाचे जतन - संवर्धन करुन जिल्ह्याचा विकास साधावा - पालकमंत्री पंकजा मुंडे






बीड, दि. 30 :- एखाद्या शासकीय योजनेला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभाला तर योजना किती चांगल्या पध्दतीने यशस्वी होते याचा परिचय जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आपणा सर्वांना आला आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वत्र मुबलक पाणीसाठा निर्माण झाला असून आता याचे जतन आणि संवर्धन करुन जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करणे हे आपले कर्तव्य आहे असे मत राज्याच्या ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
परळी तालुक्यातील धर्मापूरी येथे गावतलावाचे जलपुजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुलचंद कराड हे होते तर पंचायत समिती सभापती बिभीषण फड, शिवाजी गुट्टे, नामदेव आघाव, नेताजी देशमुख, ईश्वर क्षीरसागर आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्याला तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागला. कायमस्वरुपी दुष्काळ निवारण करण्यासाठी आणि गावशिवारात पाणी उपलब्ध होण्यासाठी शासनाने राज्यात जलयुक्त शिवार ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना सुरु केली आणि या योजनेला राज्यासह जिल्ह्यातही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव आणि प्रकल्पातील गाळ काढणे, रुंदीकरण, नाला बांध बंदीस्ती करणे आदी कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि परतीच्या चांगल्या पावसाने या कामांमध्ये मुबलक जलसाठा निर्माण झाल्याने जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा निर्माण झाला असून याचा फायदा जिल्ह्यातील शेती आणि उद्योग धंद्यांना व व्यापाऱ्यांना निश्चित होणार आहे असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासन ग्रामविकासासाठी विविध योजना राबवित असून यामध्ये रस्ते, शिक्षण, पाणी पुरवठा, आरोग्य आदी बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. योजना ग्रामीण भागामध्ये राबविण्यासाठी निधीची कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यासाठी जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी दक्ष असून याबाबत पाठपुरावा करीत आहे. परंतु गाव पातळीवर होणारी ग्राम विकासाची कामे दर्जेदार आणि दीर्घ काळ टिकणारी होण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे असे आवाहनही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
धर्मापूरी गावतलावातील पाणीसाठ्यामुळे या परिसरातील गावांना फायदा होणार आहे असे सांगून धर्मापूरी येथील किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी धर्मापूरी गावतलावातील जलसंचयाचे विधीवत जलपुजन केले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार विद्याचरण कवडकर, गटविकास अधिकारी श्री. केंद्रे यांच्यासह, अधिकारी, पदाधिकारी, धर्मापूरीसह पंचक्रोशीतील नागरिक, महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन आर.बी. फड यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा