गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अल्प असल्यामुळे स्त्रियांच्या आजारात वाढ - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे






            बीड - बीड जिल्ह्यातील महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण 7 ते 10 मि.ग्रॅमच्या आत असल्यामुळे स्त्रियांमधील वेगवेगळ्या आजारांमधील वाढ होत असून जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात महिला रक्ताच्या क्षय रोगाने पिडित असल्याची चिंता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनी आज व्यक्त केले.
            माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिरुर तालुक्यातील रायमोह येथे दोन दिवसीय प्रजनन, माता, नवजात शिशु आणि किशोरवयीन मुलांचे  आरोग्य या विषयी आयोजित विशेष जनजागृती अभियानात ते बोलत आहे. या कार्यक्रमाला शिरुर पंचायत समितीच्या सभापती मंदाताई केदार, उपसभापती जालिंदर सानप, रायमोहच्या सरपंच मेहरुनीसा शेख, रायमोहा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.हुबेकर, शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भारत धिवरे, तालुका आरोग्य अधिकारी राजेश तांदळे, ग्रामसेवक डी.एल.भवर, जालिंदर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.खोले यांची प्रमुख उपस्थित होती.
            ते पुढे म्हणाले की, स्त्रियांनी शासकीय रुग्णालयातून आपली तपासणी करुन घ्यावी.त्यासाठी लागणारी औषधी सरकारी रुग्णालयात उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. माता आणि बालक मृत्युचे प्रमाण टाळण्यासाठी उपचाराबरोबरच गरोदर मातेची काळजी घेऊन तिला सकस आणि चौरस आहार दिला तर जन्माला येणारे बाळ सुदृढ जन्माला येईल असेही ते म्हणाले.
            अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांनी बाळाचे आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी माहिती देताना किशोरवयीन अवस्थेतील मुलांनी व्यायामाबरोबरच भरपूर आहार घ्यावा आणि बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळावे तसेच आरोग्यमय जीवनासाठी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे ते म्हणाले.
            तत्पुर्वी आज सकाळी जालंदर उच्च माध्यमिक विद्यालयातून रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे गावातील जनतेला आरोग्य संपदेचा संदेश देण्यात आला. यावेळी महिला व बाल कल्याण विभाग, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने आपले स्टॉल उभारुन माहिती दिली. दोन दिवशीय कार्यक्रमात शाळा आणि महाविद्यालयीन‍ विद्यार्थ्यांना किशोर वयातील आरोग्य या विषयी तज्ञ डॉक्टरांकडून माहिती देण्यात आली. व  रांगोळी, सकस आहार, सुदृढ बालक आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. यामधील 20 विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार संचालनालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले यावेळी बोलतांना त्यांनी केंद्र  सरकारच्या विविध योजनांची माहिती देवून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  रायमोह ग्रामपंचायतीचे श्री.नेमाने यांनी केले तर आभार सहाय्यक प्रचार अधिकारी सदाशिव मलखेडकर यांनी मानले.

            या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थी आणि ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा