मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

जिल्ह्यातील दोन मोठे, 11 मध्यम आणि 103 लघु सिंचन प्रकल्प पाण्याने भरले





पर्जन्य वृष्टीमुळे जलसमृध्दीचे चित्र
जिल्ह्यातील दोन मोठे, 11 मध्यम आणि
103 लघु सिंचन प्रकल्प पाण्याने भरले
- एकुण 144 पैकी 116 प्रकल्प फुल्ल !

          बीड, दि.27 :- अलिकडे झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील 144 सिंचन प्रकल्पापैकी दोन मोठे, 11 मध्यम आणि 103 लघु सिंचन प्रकल्प असे एकुण 116 सिंचन प्रकल्प शंभर टक्के पाण्याने भरले आहेत.
          बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून जिल्ह्याची पावसाची सरासरी 666.36 मि.मी. असतांना त्या तुलनेने आजपर्यंत 108 टक्के पाऊस झाला आहे. मागील एकाच आठवड्यात जवळपास 398 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्पात उपयुक्त पाणी साठा वाढत चालला आहे.
          जिल्ह्यात माजलगाव आणि मांजरा हे दोन मोठे सिंचन प्रकल्प आहेत. हे दोन्ही प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. माजलगावमध्ये 312 दलघमी तर मांजरामध्ये 176 दलघमी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात गोदावरी खोऱ्यातील 10 आणि कृष्णा खोऱ्यातील 6 असे एकुण 16 मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी गोदावरी खोऱ्यातील 10 आणि कृष्णा खोऱ्यातील एक असे 11 मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. उर्वरीत 5 पैकी 1 प्रकल्प 50 ते 75 टक्के, 2 प्रकल्प 25 ते 50 टक्के आणि 1 प्रकल्प जोत्याच्या खाली पाण्याने भरला असून एक प्रकल्प पूर्णपणे कोरडा आहे.
          जिल्ह्यात एकुण 126 लघु सिंचन प्रकल्प असून त्यापैकी 103 लघु प्रकल्प पाण्याने शंभर टक्के भरले आहेत. 2 प्रकल्प 75 टक्के पेक्षा जास्त, 5 प्रकल्प 50 ते 75 टक्के, 3 प्रकल्प 25 ते 50 टक्के, 1 प्रकल्प 25 टक्के पेक्षा कमी आणि 8 प्रकल्प जोत्याच्या खाली पाण्याने भरले आहेत. या शिवाय लोणी, पिंपळा, पारगाव (जो) क्र.1 आणि क्र.2 हे चार लघु प्रकल्प कोरडे आहेत.

          144 मोठ्या-मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पात एकुण 839.45 दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला असून प्रकल्पीय क्षमतेच्या तुलनेने याची टक्केवारी 94.45 टक्के आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा