सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

पाटोदा तालुक्यात निवडणूक तयारी मतदान व मतमोजणी केद्रात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



            बीड, दि. 13 :- बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या समवेत घेऊन मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश दिले.
            पाटोदा येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उस्मानाबादचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अजिंक्य पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मुकेश कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, पथकांचे प्रमुख उपस्थित होते.
            पाटोदा तालुक्यात 3 गट आणि 6 गण असून यासाठी 103 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यापैकी 33 केंद्र संवेदनशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मतदान यंत्राच्या साहित्याची संपूर्ण तयारी झाली असून मतदान प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी 565 कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. यासाठी 12 क्षेत्रीय अधिकारी 12 विभागावर संपर्क ठेवणार असून वेळोवेळी त्यांच्याकडून माहिती नियंत्रण केंद्राकडे येणारआहे. सर्व मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त राहणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
            जिल्हाधिकारी राम यांनी संपूर्ण निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तसेच व्हिडीओ चित्रीकरण व सीसीटीव्ही पथकाची नेमणुक करण्याची सूचना केली. मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षाविषयक बाबी तपासून पूर्ण कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत अप्रिय घटना घडणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. निवडणूकीची तयारी चांगली झाली असून आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी  सर्व निवडणूक यंत्रणांनी व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडाव्यात अशी सुचना करुन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
            जिल्हाधिकारी राम व पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाटोदा तालुक्यातील तांबाराजूरी या गावातील दोन आदर्श मतदान केंद्राला भेटी देवून पाहणी केली. तसेच त्यांनी संवेदनशील असलेल्या रोहतवाडी येथील दोन मतदान केंद्रांनाही भेटी देऊन तेथील मुलभूत सुविधांची पाहणी केली. मतदान केंद्र परिसरात करावयाच्या जादा पोलीस बंदोबस्ताविषयीही त्यांनी यावेळी चर्चा केली.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा