मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

परळी तालुक्याचा घेतला आढावा संवेदनाशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा ठेवावी - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



            बीड, दि. 14 :-  बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कडक नजर ठेवावी असे निर्देश दिले.
            जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 च्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली परळी वैजनाथ तहसील कार्यालयात सर्व संबंधित व पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन घेण्यात आली. या बैठकीस पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर, अतिरिक्त पोलीस अधिकारी दिक्षीतकुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद, पोलीस निरीक्षक चाटे, त्रिभुवन आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी राम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना त्यांच्या झोनमधील सर्व मतदान केंद्रांची तपासणी करुन निवडणूक पारदर्शक व नि:पक्ष वातावरणात पार पाडण्याच्या सूचना केल्या. तालुक्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर आवश्यक प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासमवेत एक व्हिडीओ पथक देण्यात येणार असून प्रत्येक मतदान  केंद्रावर पोलीस यंत्रणेची करडी नजर ठेवण्याच्याही सूचना दिल्या. तसेच संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मतदानाच्या पुर्वी पोल चिट वाटप करण्याचे काम पूर्ण करण्याबाबत, मतदान केंद्रावर उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रामध्ये दिलेल्या शपथपत्रातील मालमत्तेचे बोर्ड लावण्याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही याचीही दक्षता घ्यावी असेही सूचित केले. तसेच जिल्हा परिषद  पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व मतदान प्रक्रीया शांततेत पार पडेल यादृष्टीने कार्यवाही करावी असे सांगितले.
-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा