बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अंबाजोगाई व केज तालुक्यातील निवडणूकीचा घेतला आढावा


बीड, दि. 15 :- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व केज तालुक्यांना भेटी देऊन जिल्हाधिकारी  नवल किशोर राम यांनी निवडणूकीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
अंबाजोगाई तालुक्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांनी ही बैठक घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शरद झाडके, पोलीस निरीक्षक गंदम, गीते, विसपुते तसेच क्षेत्रीय अधिकारी व पथक प्रमुख उपस्थित होते.
मतदान प्रक्रीया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी केंद्राध्यक्ष महत्वाचा घटक असून त्यांनी मतदान केंद्राच्या कामात सक्षमपणे लक्ष द्यावे असे सांगून जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्राशी संपर्क ठेऊन माहिती द्यावी. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई  मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलीस विभागाने कडक बंदोबस्त ठेवावा. मतदानानंतर मतदान यंत्र सुरक्षीत ठेवण्यासाठी सुरक्षा कक्ष सज्ज करण्यात यावा व त्या ठिकाणी सीसीटीव्ही व व्हिडीओ यंत्रणा प्रस्थापित करण्यात यावी असे सांगून त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
केजला घेतला आढावा
जिल्हाधिकारी राम यांनी केज येथील तहसील कार्यालयात केज तालुक्यातील निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा  घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक विषयक कामकाजाच्या प्रत्येक बाबींच्या कार्यवाहीची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, निवडणूक निर्णय अधिकारी तथा लातूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संजय तुबाकले, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अविनाश कांबळे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा