सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

आष्टी तालुक्याची निवडणूक तयारी 222 मतदान केद्रांच्या ठिकाणी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवावा - जिल्हाधिकारी




            बीड, दि. 13 :- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकीची तयारी पूर्ण झाली असून तालुक्यातील संपुर्ण 222 मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवावा अशी सुचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
            आष्टी येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांनी बैठक घेऊन निवडणूक कामाकाजाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा  बीडचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) व्ही.पी. सोळंके, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी व विविध पथकांचे प्रमुख उपस्थित होते.
            आष्टी तालुक्यातील 7 गट आणि 14 गणांसाठी निवडणूक होत असून यासाठी 222 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यापैकी 31 केंद्र संवेदनशील तर 11 केंद्र अतिसंवेदनशील आहेत. या मतदान केंद्राच्या ठिकाणी वाढीव पोलीस बंदोबस्त लावण्याबरोबरच तेथे सीसीटीव्ही आणि व्हिडीओ कॅमेरा पथक नेमण्यात येवून नियंत्रण ठेवावे अशी सुचना करुन जिल्हाधिकारी राम म्हणाले की, मतदान केंद्रावर साहित्यासह कर्मचारी पोहचण्यासाठी वाहतुक व वाहन व्यवस्था ठेवावी. त्यासाठी निश्चित असा आराखडा तयार करुन त्याप्रमाणे वेळेवर मतदान यंत्र व कर्मचारी पोहचतील याची व्यवस्था करावी. त्यासाठीचे वाहतूक मार्ग निश्चित करावेत. तालुक्यात 14 विभाग करण्यात आले असून त्यासाठी 222 मतदान कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांना आतापर्यंत  प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणखी एक प्रशिक्षण उद्या देण्यात येणार आहे. सर्व मतदान यंत्राची सिलिंगचे काम पूर्ण झाले असून मतदान पथक सज्ज झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
            जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी तहसील कार्यालयातील मतदान यंत्राच्या सुरक्षा कक्षाला  भेट देवून पाहणी केली. यावेळी मुर्शदपूर क्षेत्राच्या पंचायत समिती सभागृहातील मतदान केंद्राचीही पाहणी करण्यात आली.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा