शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सुलभ मतमोजणी प्रक्रीयेसाठी यंत्रणांनी सज्ज रहावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



बीड, दि. 18 :- बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी 11 तालुक्याच्या ठिकाणी होणार असूल सुलभ मतमोजणी प्रक्रीयेसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
निवडणूक मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षामध्ये घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्यातील मतमोजणीच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेताना जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की,  निवडणूक प्रक्रीयेचा मतदानाचा महत्वाचा भाग अत्यंत शांततेत आणि समाधानकारक पार पाडल्या गेला आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मतमोजणीची प्रक्रीया आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्र आणि सुरक्षा कक्षाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त राहिल याची दक्षता घ्यावी. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी राबविण्यात येणारी मतमोजणीची कार्यपध्दती आवश्यक टेबल व मनुष्यबळाची व्यवस्था, मतमोजणी कक्षाची रचना इत्यादी बाबींविषयी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने नियोजन करावे. शक्यतो मतमोजणीचे निकाल लागण्यास उशीर होणार नाही अशा निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करावा. प्रत्यक्ष मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षण देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी प्रतिनिधींकडून गैरवर्तन होणार नाही यासाठी बंदोबस्त ठेवावा. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी, पत्रकारांना प्रवेशपत्र देऊन त्यांना माहिती वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसारमाध्यम कक्ष आवश्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांसह स्थापन करण्यात यावा. वृत्तसंकलनासाठी त्यांना सहकार्य करावे असेही निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
बीड जिल्हा परिषदेच्या 60 गटासाठी आणि 11 पंचायत समितीच्या 120 गणासाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान  झाले असून त्याची मतमोजणी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी केंद्रात गुरुवार, दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. या अनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा