रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

गेवराई-शिरुर तालुक्याचा आढावा मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसर सीसीटिव्हीच्या नियंत्रणाखाली ठेवा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम





            बीड, दि. 12 :- बीड जिल्ह्यातील गेवराई व शिरुर कासार तालुक्यातील निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी आज आढावा घेतांना मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सीसीटिव्ही व व्हिडीओ पथके नेमून नियंत्रण ठेवावे असे निर्देश दिले.
            गेवराई येथील नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. गेवराई तालुक्यातील जि.प.गट 9 आणि पं.स. गण 18 आहेत यासाठी 252 मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले. अशा केंद्राच्या ठिकाणी अधिक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी राम म्हणाले की, तालुक्यातील सर्व झोनल अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदान केंद्राची  पाहणी करुन त्या ठिकाणी सर्व मुलभूत सुविधा असल्याची खात्री करावी. नसल्यास त्या भौतिक सुविधा पूर्ण करुन घ्याव्यात. मतदान यंत्राचे सिलिंग मतदानानंतर यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठीच्या कक्षाची पाहणी करुन जिल्हाधिकारी राम यांनी मतमोजणी केंद्राच्या  सुरक्षिततेबाबत विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या.  मतमोजणीसाठी अट्टल महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी करुन त्यांनी निवडणूक विषयक सुचना दिल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी गेवराई तालुक्यातील गढी, पाडळसिंगी आणि मादळमोही येथील मतदान केंद्रांना भेटी देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाउपनिबंधक मंगेश सुरवसे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आशिष बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार चाफेकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
शिरुर तालुक्याचा आढावा
            जिल्हाधिकारी राम आणि पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी गेवराई नंतर शिरुर कासार तालुक्यातील तिंतरवणी, मातोरी आणि वारणी येथील मतदान केंद्रांना भेटी देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली व अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. त्यानंतर त्यांनी शिरुर कासार येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उस्मानाबाद जि.प.चे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) डॉ.आर.एच.चव्हाण आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आबासाहेब चौरे यांच्यासह सर्व झोनल अधिकाऱ्यांच्याकडून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.
            शिरुर तालुक्यातील 4 गट व 8 गणासाठी निवडणूक होत असून यासाठी 121 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी 36 केंद्र संवेदनशील आहेत. या सर्व ठिकाणी वाढीव बंदोबस्त आणि व्हिडीओ व सीसीटिव्हीची व्यवस्था ठेवून नियंत्रण करावे. झोनल अधिकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्राना सतत भेटी देवून मतदानाची व प्रक्रीयेविषयीची माहिती तात्काळ देण्याची गरज आहे त्यादृष्टीने नेटवर्क उपलब्ध असलेल्या मोबाईल कंपनीचे सिमकार्ड उपलब्ध करावेत अशी सुचना करुन जिल्हाधिकारी राम म्हणाले की, प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी सर्व सुविधा असल्या पाहिजेत. विशेषत: दिव्यांगासाठी मतदानाला सहकार्य होईल यासाठी रॅम्पची व्यवस्था ठेवावी. विद्युत व पाणी व्यवस्था असली पाहिजे. वाहने व मनुष्यबळाची व्यवस्था चोख ठेवावी असे सांगून त्यांनी यावेळी सुरक्षा बंदोबस्ताचाही आढावा घेतला.

            यावेळी मतदान यंत्राच्या पूर्व तयारीच्या कामकाजाची त्यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यंत्राच्या सिलिंगचे काम सुरु असून त्यांनी मतदान यंत्राच्या सुरक्षा कक्षाचीही पाहणी करुन सुचना दिल्या. यावेळी निवडणूकीशी संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा