मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

माजलगाव तालुक्याची निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सज्ज रहावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



            बीड, दि. 14 :- बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या समवेत माजलगाव येथे घेतला. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रीया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन दक्ष राहण्याच्या सूचना केल्या.
             माजलगाव येथील तहसील कार्यालयात त्यांनी ही आढावा बैठक घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, निवडणूक निर्णय अधिकारी राजेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. हरी बालाजी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नरसिंग झंपलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
            तहसील कार्यालयातील मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची व मतमोजणी केंद्राची  प्रत्यक्ष पाहणी करुन  जिल्हाधिकारी राम यांनी कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, माजलगाव तालुक्यातील 179 मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवावा. त्यापैकी 34 संवेदनशील केंद्रांना अधिक सुरक्षा व्यवस्था करावी. सीसीटीव्ही व व्हिडीओ पथकाची व्यवस्था अपरिहार्य आहे. मतदान यंत्रणांनी अधिक दक्ष राहून प्रक्रीया पार पाडायची आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावयाची आहे. आवश्यक मनुष्यबळ, वाहने, मतदान साहित्य आदिबाबतही अधिक काळजीपूर्वक कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            वाहतुक व्यवस्थेसाठी 20 बसेस, 10 टेम्पो आणि 36 जीपचा ताफा उपलब्ध करुन देण्यात  येत आहे. 20 झोनल अधिकारी सर्व मतदान केंद्राच्या संपर्कात राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. जवळपास 1150 कर्मचारी या मतदान कामकाजासाठी नियुक्त झाले असल्याचेही यावेळी सांगितले. संपूर्ण  तयारी झाली असून मतदान कर्मचारी  पथके वेळेवर मतदान केंद्राला साहित्यासह पोहचणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी सर्व निवडणूकीशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी राम व पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी माजलगाव तालुक्यातील पाथरुड येथील आठ मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
-*-*-*-





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा