शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

वडवणी तालुक्याचा घेतला आढावा मतदान आणि मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त ठेवावा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



            बीड, दि. 10 :- वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मतदान केंद्राच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले.
            वडवणी येथील तहसील कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी तथा उस्मानाबादच्या उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सतिष थेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            वडवणी तालुक्यातील  2 गट आणि 4 गणासाठी निवडणूक होत असून यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 79 मतदान केंद्रांच्या ठिकाणी मुलभूत सुविधेची संयुक्त पथकाने पाहणी केली आहे. तेथील त्रुटी दूर करण्यासाठी सर्व संबंधित गट विकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांना सूचना  करुन जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूकीच्या पूर्वतयारीचा संपूर्ण आढावा घेतला.
            मतदान व मतमोजणी केंद्राच्या व्यवस्थेचा आढावा घेताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, तहसील कार्यालय परिसरातील मतमोजणी केंद्राला पाऊस आल्यामुळे अडचण निर्माण झाल्यास यासाठी लागणारी पर्यायी जागा निश्चित करुन ठेवण्यात यावी. स्ट्राँगरुमची व्यवस्था चोख ठेवावी. संपूर्ण तहसील परिसर टिव्ही व व्हिडीओ पथकाच्या नियंत्रणाखाली ठेऊन बंदोबस्त करावा. मतदान यंत्र व त्यांच्या सुव्यवस्थेबाबत आढावा घेऊन ते म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक वाहनांचा पुरवठा करावा. त्यांना दुर्गम भागातील संपर्कासाठी मतदानाच्या दिवशी वायरलेस सेट आणि भ्रमणध्वनी व्यवस्था करण्यात यावी. यासाठी झोनल अधिकाऱ्यांनाही वेळेत संपर्क साधण्यासाठी प्रभावी व्यवस्था करण्यात यावी असेही ते म्हणाले.
            पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस विभागाच्या कार्यवाहीबाबत आढावा घेऊन तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

            या बैठकीस निवडणूकीशी संबंधित अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा