बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज


बीड, दि. 15 :- बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी गुरुवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2017 रोजी बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रीया होत असून यासाठी राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या जिल्हा प्रशासनाच्या सर्व 11 तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने बीड जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या एकूण 60 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 120 गणांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 11 तालुक्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील निवडणूकीच्या कामकाजाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 866 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून 15 लाख 1 हजार 551 मतदारांची संख्या आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी अधिकचे मनुष्यबळ आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अशा मतदान केंद्रांच्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि व्हिडीओ कॅमेरांच्या माध्यमातून कडक नजर ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 1 हजार 866 मतदान केंद्रांच्या ठिकाणी 197 क्षेत्रीय अधिकारी, 2007 मतदान केंद्राध्यक्ष,  7 हजार 820 मतदान अधिकारी, 2007 शिपाई याप्रमाणे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रांचे साहित्य संबंधित अधिकाऱ्यांना सुपुर्द करण्यात आले असून मतदान केंद्राच्या ठिकाणी पात्र मतदारांना सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंतच्या कालावधीत मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे. जि.प. व पं.स. निवडणूकीसाठी प्रत्येक मतदारास दोन मते द्यावी लागणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, वीज, रँप आणि सुरक्षा ईत्यादी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या दर्शनी भागात उमेदवाराची माहिती प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यासोबतच मतदान प्रक्रीयेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. शस्त्रबंदी,हद्दपारी व स्थानबध्दतेचीही कारवाई मोठ्या प्रमाणात करून शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रीयेवर देखरेख ठेवण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणूकीसाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी विविध यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या मुख्य निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निरीक्षक हे सुध्दा मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून राहणार आहेत. सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क नक्की बजावावा असे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.
मतदान प्रक्रीया संपल्यानंतर सर्व मतदान यंत्रे सुरक्षीत ठेवण्यासाठी तालुकापातळीवर सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आले असून त्याठिकाणी कडक बंदोबस्तात मतदान यंत्रे ठेवण्यात येणार आहेत. निवडणूकीची मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी गुरुवार, दिनांक 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10 वाजेपासून होणार आहे.
                                                                                 -*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा