सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

नवरात्रीच्या अनुषंगाने हॉटेल व किराणा अन्न व्यावसायिकांनी नियमानुसार काळजी घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

बीड, दि. 26 (जि. मा. का.) : अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमने २०११ अंतर्गत पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांचे पालन करून भंडारा व प्रसाद वाटप करावे जेणेकरून भक्तगणास चांगल्या प्रकारचा प्रसाद मिळेल. हॉटेल व किराणा अन्न व्यावसायिकांनी नवरात्रीच्या अनुषंगाने नियमानुसार काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्न व्यावसायिकांनी तयार केलेला प्रसाद शक्यतो प्लॉस्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा, जेणेकरून प्रसादाला धूळ, माती, माशा, मुख्यतः इतर कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिने नाक, कान, डोके, केस खाजवणे वा डोळे चोळणे टाळावेत. अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिने शिंकणे, थुंकणे, नाक शिंकरणे, तंबाखु वा धूम्रपान करणे टाळावे. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तिने अन्न पदार्थ बनविणे व हाताळण्याची कामे करू नये. अन्न पदार्थ हाताळणाऱ्या सर्व व्यक्तिंचे कपडे स्वच्छ असावेत. अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिंची नखे व्यवस्थित कापलेली असावीत व त्यात घाण साचलेली असू नये. अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिने साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामास सुरुवात करावी. अन्न व्यावसायिकांनी आवश्यक तेवढेच अन्न पदार्थ विशेषतः दूध व दुग्धजन्य अन्न पदार्थ ताजे तयार करून भक्तांना वाटावेत, जेणेकरून ताजे अन्न पदार्थ भक्तांना मिळतील व ते उरणार नाहीत वा साठवण्याची तजबीज करावी लागणार नाही. शिळा प्रसाद भक्तांना वाटप करु नये. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्य तेलाचा पुनर्वापर करु नये. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी व भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे. पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात साठवावे, त्यावर स्वच्छ झाकण झकलेले असावे, पाणी घेण्यासाठी लांब दांड्याचे स्वच्छ वगराळे असावे. पिण्याचे पाणी निर्जंतुक करून पिण्यास द्यावे. पिण्याचे पाणी देताना त्यात बोटे बुडवु नयेत. भांड्याचा वापर करण्यापूर्वी ती डिटर्जंट पावडरने स्वच्छ घासून व स्वच्छ पाण्याने धुवुनच वापरावीत. भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा तसेच भांडी स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवावी. हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा वापरावा व अन्न पदार्थ तयार करणाऱ्या व्यक्तिने हातमोजे व अॅप्रॉन घालावा. तसेच, केस संपूर्णपणे झाकणारी टोपी व तोंडाला मास्क घालावा. कच्च्या अन्न पदार्थांची खरेदी बिले बाळगावीत व कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक दुकानातून खरेदी करावी. भगर, शाबुदाणा, खाद्यतेल विकत घेताना ते पॅकबंद विकत घ्यावे. भगर, शाबुदाणा, खाद्यतेल विकत या अन्नपदार्थावर कुठल्याही अन्नपदार्थाचा नाव ब्रॅन्ड नसल्यास दुकानदारास ब्रँडबद्दल विचारणा करावी. प्रक्रिया उद्योगात भगर, शाबुदाणा, खाद्यतेल यांचे उत्पादन केव्हा झाले याचा तपशील असतो तो पाहुन घ्यावा त्यासह बेस्ट बिफोर म्हणजे त्या अन्नपदार्थाची मुदत केव्हा कालबाह्य होते तेही तपासून पाहावे. भगरीचे खुले व विनालेबल असलेले पीठ बाजारतून विकत घेवू नये. भगर विकत घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवुन त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे. भगरीचा वापर करताना ती स्वच्छ धुवन घ्यावी. नवरात्रीच्या अनुषंगे दुकानदारांनी घ्यावयाची काळजी 1. विनाबिलाने कोणतेही अन्नपदार्थ खरेदी व विक्री करु नये, ब्रँडेड ( चांगल्या प्रतीची ) भगर व पॅकबंदच अन्नपदार्थ विकी करावे, मुदतबाह्य झालेले अन्नपदार्थ विकी करु नये, हॉटेल चालकांनी घ्यावयाची काळजी हॉटेल चालकांनी एकमेकात अंतर राखणे मास्क वापरणे. वारंवार हाताची सॅनिटाईज करणे व स्वच्छ करणे. या बाबींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. हॉटेलचे किचन तसेच अन्नपदार्थ सेवन करण्यासाठीची जागा त्या ठिकाणच्या भिंती, जमीन व फरशी स्वच्छ असावी, कच्चे अन्नपदार्थ घटक पदार्थ यांचा खरेदी बिल तपशील व्यवस्थित असावा, तसेच साठा रजिस्टरमध्ये त्यांची नोंद असावी. अन्नपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिंना गणवेश, टोप्या, मास्क, ग्लोव्हज इत्यादी स्वच्छतेच्या बाबी पुरविण्यात याव्यात. हॉटेलमधील सर्व कामगार तसेच अन्नपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिंची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. हॉटेलमध्ये हात धुण्यासाठी वॉशबेसिन व्यवस्था व त्या ठिकाणी साबण, सॅनिटायझर ठेवावे. ताज्या अन्नामध्ये शिळे अन्न मिसळू नये तसेच शिळे अन्नपदार्थ, वास येणारे अन्न पदार्थ हे कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला पुन्हा शिजवून देऊ नये. अन्न व्यावसायिकांनी वरील सर्व सूचनांचे पालन करून अन्न व औषध प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन बीड यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा