बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बीड, दि.27 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी महामंडळाच्या www.msobefdc.in ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.आर. गुट्टे यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई जिल्हा कार्यालय , बीड यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे , त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ही योजना आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रकिया व पशुविज्ञान या क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच लागू असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महामंडळाच्या www.msobefdc.in या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन सर्व माहिती भरुन अर्ज सादर करावेत व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. विद्यार्थ्यांनी काही अडचण अथवा समस्या असल्यास जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी रुपये एक लक्ष थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व 20 टक्के बीज भांडवल योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा. -*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा