शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

जिल्ह्यात स्वाईन फ्लु रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना



            बीड, दि. 21 :- जिल्ह्यात आढळुन येत असलेल्या स्वाईन फ्लु रुग्णांसाठी बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह 5 ठिकाणी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई आणि जिल्हा रुग्णालय,बीड तसेच अधिनस्त 13 उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, 28 प्राथमिक आरोग्य केंद्र असे एकुण 42 स्क्रिनिंग सेंटर आहेत. स्वाईन फ्लु रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालय व रुग्‍णालय अंबाजोगाई तसेच उपजिल्हा रुग्णालय परळी,केज आणि गेवराई या 5  ठिकाणी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

            स्वाईन फ्लूबाबत जनतेस आरोग्य शिक्षण महत्वाचे असून सध्या आढळून येत असलेल्या स्वाईन फ्लूची प्रकरणे पाहता सर्वसामान्य जनतेसाठी वैयक्तिक पातळीवर स्वाईन फ्लू प्रतिबंधाच्या महत्वपूर्ण उपाययोजना नव्याने सांगणे आवश्यक आहे. विशेषत: खालील संदेश आपल्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचतील याची खबरदारी घ्यावी. स्वाईन फ्लू टाळण्यासाठी हे करा वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा, पोष्टिक आहार घ्या, लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यासारख्या आरोग्यदायी पदार्थाचा आहारात वापर करावा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या, तसेच  भरपूर पाणी प्यावे. याबरोबरच स्वाईन फ्लू टाळण्यासाठी हस्तांदोलन करुन नका, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका, आपल्याला फ्लू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, या मार्गदर्शक सुचनांचा सुयोग्य उपयोग करुन फ्लू प्रतिबंध व नियंत्रणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे बीड जिल्ह्यातील जनतेला करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा