शनिवार, २९ एप्रिल, २०१७

10 व 11 मे रोजी पाणस्थळावर वन्य प्राण्याची गणना होणार



          बीड, दि.29 :- वन्यजीव विभाग औरंगाबाद अंतर्गत औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यात समाविष्ट असलेल्या गौताळा औट्रमघाट वन्यजीव अभयारण्य, पैठण तालुक्यातील जायकवाडी पक्षी अभयारण्य, बीड जिल्ह्यातील नायगाव मयूर अभयारण्य आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात दि.10 मे 2017 च्या दुपारपासून ते दि.11 मे च्या दुपारपर्यंत 24 तासाच्या कालावधीत पाणस्थळावर आधारीत वन्य प्राण्यांनी गणना करण्यात येणार आहे.

          याकरीता संरक्षित क्षेत्रनिहाय पाणवठ्याची संख्या निश्चित करण्यात आली असून त्यात वन्यप्राण्यांच्या वापरासाठी सातत्याने पाणी उपलब्ध राहील याचे वन कर्मचाऱ्यांमार्फत सनियंत्रण करुन खात्री करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून त्या क्षेत्राच्या वन्यजीव व्यवस्थापनेतून वन्य प्राण्यांच्या संख्येत बदल अथवा वाढ याबाबतचा निष्कर्ष काढण्यासाठीचा अंदाज प्राप्त होणार आहे. कार्यक्रमाच्या उदिष्टास अनुसरुन वन्यप्राण्यांना निर्धोक आणि बाधारहित वातारण उपलब्ध व्हावे. यासाठी अभयारण्य क्षेत्रातून होणाऱ्या वाहतूक आणि प्रवेशावर नियंत्रण आनणेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.पाणवठ्यावर प्रगणकाला बसण्यासाठी मचाणी तसेच लपणगृह पुरेशा आधी तयार करण्याची कार्यवाही सुरु असून संबंधीत वन कर्मचारी व निसर्गप्रेमी प्रगणक यांना यासाठीच्या कार्यपध्दतीसंबंधी विशेष प्रशिक्षण  देण्यात आले आहे. अशा जबाबदारीच्या आणि जंगलात वनयप्राण्यांना कोणतीही बाधा निर्माण न करता 24तास जागे राहून गणना करण्याच्या कामासाठी आवश्यक असणारी जबाबदारी  आणि चिकाटी लक्षात घेवून अशा गुणसंपन्न खाजगी निसर्गप्रेमींची निवड विभागामार्फत करण्यात येत असून त्यासाठी या क्षेत्रात सक्रिय असलेल्या अशासकीय निसर्गप्रेमी संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहे. अशा प्रगणकांचे कार्यपध्दती आणि अटी व शर्तीबाबतचे पुर्व प्रशिक्षणसुध्दा आयोजित करण्यात येत आहे. या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे उदिष्ट लक्षात घेवून त्याच्या आवश्यकतेनूसार योग्य त्या सर्व कायदेशीर उपाययोजना करुन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 व इतर कायद्यानूसार प्राप्त अधिकारांचा वापर करुन हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सुचना  संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आल्या असून त्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. असे औरंगाबादचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा