शनिवार, २२ एप्रिल, २०१७

प.दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहिम बीड जिल्ह्यात यशस्वी करावी - खासदार डॉ.प्रितम मुंडे



            बीड, दि. 22 :- गोरगरीब, गरजू रुग्णांना विनामुल्य वैद्यकीय सेवा देवून स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत बीड जिल्ह्यात येत्या 1 मे पासून 27 मे पर्यंत पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यांनतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी व उपचार शासकीय योजनेतून मोफत केले जाणार आहेत. या मोहिमेचे  सुयोग्य नियोजन करुन बीड जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी केले.
            पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील बीडसह सहा जिल्ह्यात पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक खासदार डॉ.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस  जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार संगीता ठोंबरे, आमदार लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती  होती.
            अभियानाचे कोटकोट नियोजन करण्याच्या सुचना  देवून खा.डॉ.मुंडे पुढे म्हणाल्या की, सर्व  प्राथमिक आरोग्य केंद्र  पातळीपर्यंत आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रम राबवून प्रत्येक रुग्णांची तपासणी करुन ऑनलाईन माहिती शासनाला पुरवावी म्हणजे त्याला आरोग्य तपासणी व औषधोपचाराचा लाभ देणे शक्य होईल. ही मोहिम खास करुन बीड जिल्ह्यात राबविण्यात येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेने खाजगी वैद्यकीय व्यावसायिकआणि स्वयंसेवी संस्थांची मोठ्या प्रमाणात मदत घेणे आवश्यक आहे. या मोहिमेत श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, हदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदुचे विकार, मुत्ररोग आदि वीस विषयातील आजारासंदर्भातील पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्‍णांनी घ्यावा असेही आवाहन खा.डॉ.मुंडे यांनी यावेळी केले.
            प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे यांनी प्रास्ताविकाम सादरीकरणाद्वारे अभियानाची सविस्तर माहिती दिली.  जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालये, 1 स्त्री रुग्णालय, 10 ग्रामीण रुग्णालये, 50 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 280 उपकेंद्राच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्याचे नियोजन असून सर्वस्तरावर प्रशिक्षण आणि विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची  माहिती यावेळी देण्यात आली. या अभियानाचे उदघाटन बीड येथे पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांच्या हस्ते 1 मे रोजी करण्यात येणार असल्याचे  सांगून ग्रामीण रुग्णालय स्तरावरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

            या बैठकीत आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, आणि विविध विभागांचे अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा