शनिवार, २२ एप्रिल, २०१७

खरीप हंगामपूर्व आढावा बैठक शेती आणि शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा - खासदार डॉ.प्रितम मुंडे






            बीड, दि. 22 :- बीड जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी खरीप हंगामाचे सुयोग्य नियोजन कृषी विभागाने केले असून यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वयातून कामकाज करावे अशी सुचना बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी केली.
            बीड जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्या बोलत होत्या बैठकीस जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार आर.टी.देशमुख, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती घेतल्यानंतर खासदार डॉ.मुंडे म्हणाल्या की, खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या खत आणि बियाण्यांची मुबलक प्रमाणात मागणी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना खतांचा आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. बहुतांश वेळा शेतकरी  आपल्याकडील पारंपरिक बियाणे वापरत असतो. अशा बियाण्यांची गुणवत्ता तपासून कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या खते व बियाण्यांची गुणवत्ता तपासण्याची कार्यवाही कृषी विभागाने करावी. प्रामुख्याने यासाठी विशेष पथके कार्यान्वित करावीत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिक कर्जाची मोठी आवश्यकता भासते. अशा वेळी बँकांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करुन दिले पाहिजे. पिक अनुदान वाटपाची कार्यवाही तात्काळ झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा उपयोग खरीप हंगामात होईल असेही खा.डॉ.मुंडे म्हणाल्या.
            शेतकऱ्यांना शेती पंपासाठी विजपुरवठ्याची प्रकरणे महावितरणने तात्काळ निकाली काढावीत अशी सुचना करीत खा. डॉ.मुंडे म्हणाल्या की, सोलार पंप पुरवठ्याची शासनाची योजना बीड जिल्ह्यासाठी असून यासाठी 200 चे उद्दिष्ट आहे. उद्दीष्टपूर्तीसाठी महावितरणने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी जनजागृती करावी.याशिवाय अखंडीत वीजपुरवठ्यासाठी  महावितरणने आग्रही रहावे अशी अपेक्षाही खा.डॉ.मुंडे यांनी व्यक्त केली.
            प्रारंभी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने यांनी सादरीकरणाद्वारे खरीप हंगामपूर्व तयारीची सविस्तर माहिती दिली. खरीप हंगामात प्रामुख्याने बाजरी, सोयाबीन, तुर आणि कापुस या पिकाचे उत्पादन घेतले जाते.गेल्या तीन वर्षात 2016-17 हे वर्ष सोडले तर कमी पाऊसमानामुळे कायम उत्पादकता खालावली  होती. यावर्षी खरीप हंगामात सुधारणा अपेक्षित असून मागील दहा वर्षातील पिक क्षेत्रातील बदलाचा आढावा घेतलाअसता कापूस पिकामध्ये  यंदा दुप्पट वाढ दिसून येते. याशिवाय खरीप ज्वारीमध्ये 3पट आणि बाजरी पिकामध्ये 2 पट घट दिसून येत आहे. प्रामुख्याने  हलक्या जमीनीवर कापूस व सोयाबीन पेरणी वाढल्याने उत्पादनात घट दिसून येत असल्याचा  अंदाज आहे. यावर्षी खरीप हंगामासाठी 7 लाख 54 हजार 551 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या 115 टक्के क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी महाबीज आणि खाजगी कंपन्यांकडून एकुण 70 हजार 399 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. तसेच 2लाख44 हजार 834 मेट्रीक टन खताची मागणी  असून मागील वर्षीचा 31 हजार 40 मेट्रीक टन खताचा साठा शिल्लक असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.
            या बैठकीत कृषी निविष्ठा केंद्रामार्फत शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहाराची सुविधा देण्यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात 7  केंद्रचालकांना पीओएस मशिनचे वितरण खा.डॉ.मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अशा प्रकारे जिल्ह्यात 600 मशिनचे वितरण येत्या आठवडाभरात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी  यावेळी दिली.

            यावेळी बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सुचनांची नोंद घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस कृषी विभागासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा