शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

उष्माघाताच्या प्रतिबंधक उपाययोजना नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन



          बीड, दि. 28 :- बीड जिल्ह्यात सध्या तापमानात मोठी वाढ झाली असल्यामुळे उष्माघाताचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे. उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन सुचना सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालयातर्फे सर्वत्र देण्यात येत आहेत. उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी विविध उपाययोजना हाती घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
            सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जुन महिन्यामध्ये प्रादुर्भाव होत असतो. तसेच त्यामुळे मृत्युही होने संभवनिय असते. महाराष्ट्रात विदर्भ व मराठवाडा या विभागात उष्माघात प्रादुर्भाव आढळुन येतो त्या मानाने इतरत्र प्रमाण अगदी अल्प असते.  उष्माघाताने मृत्यु होऊ नये यासाठी आपण आतापासूनच जागरुक राहिले पाहिजे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये तापमानात प्रथम हळूहळू अथवा एकदम यापैकी कोणत्याही प्रकारे वाढ होत असते. याचा अभ्यास करण्यासाठी वरील कालावधीमध्ये दररोजच्या तापमानाची (कमाल-किमान) नोंद ठेवण्यात येत आहे.
            उष्माघात होण्याची उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो. ही याची कारणे आहेत.      उष्माघातामध्ये थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन व अस्वस्थता, बेशुध्दावस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत.
            वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावीत, उष्णता शोषूण घेण्यारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे) वापरु नयेत, सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. उन्हामध्ये काम करताना मधून मधून सावलीत थोडीसी विश्रांती घ्यावी, उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे, उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा. हे प्रतिबंधात्मक उपाय करावेत.

            उष्माघात झालेल्या रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत किंवा वातानुकूलीत खोलीत ठेवावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक लावावेत, आवश्यकतेनूसार शीरेवाटे सलाईन द्यावी हे उपचार करावेत. जनतेला उष्माघाताची कारणे व लक्षणे व प्राथमिक उपाययोजना त्याचप्रमाणे उष्माघात होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थातून उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा