गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

बीड जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करावा - गगराणी





       बीड, दि. 27 :- तीन वर्षात राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा  शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम असून बीड जिल्हयातील कार्यान्वयीन यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीच्या दिलेल्या उद्दिष्टाच्या पूढे जावून काम केले तरच वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जिल्हयात यशस्वी होईल असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सन 2017 च्या पावसाळयामध्ये वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समिती सदस्य व कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
          पुढे बोलतांना प्रभारी जिल्हाधिकारी श्री. गगराणी म्हणाले की, शासनाने सन 2017 ते 2019 या वर्षामध्ये दरवर्षी जून-जुलै महिन्यात एकंदर 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून प्रत्येक जिल्हयाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दिलेले  उद्दिष्ट  वेळेत पार पाडण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले पाहिजे. दिलेले उद्दिष्ट साध्य केले पाहिजे. तसेच जिल्हयातील सर्व स्तरातून या कामामध्ये  सहभाग नोंदविला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
           जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, दवाखाने, ग्रामपंचायत, गायरान जमीन, मोकळया असलेल्या जमीनीवर संबंधित यंत्रणेनी वृक्ष लागवड केले पाहिजे यासाठी मे अखेरपर्यंत  झाडे लावण्यासाठी खड्डयाचे खोदकाम पुर्ण होणे आवश्यक आहे. झाडे लावण्यासाठी नरेगाच्यामाध्यमातून खड्डयाचे  व चर खोदकाम करावे असे सांगुन  या कामांना आता प्राधान्य दयावे. तसेच शाळा, कार्यालयास  झाडांची कंपाऊंड तयार करावे यासाठी कार्यालयाच्या सभोवताल चर खोदून त्याच्या दोन्ही बाजूस झाडे लावावे.  ग्रामीण भागात जास्ती-जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे यासाठी संबंधितानी याकामी लक्ष देणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड केल्यानंतर ते जगले पाहिजे यासाठी वृक्ष लागवड करतांना रोपाचे वय कमीत कमी एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे ते झाड जनावरांनी खावू नये अशा वृक्षाची निवड करावी. जिल्हयात मोठयाप्रमाणात एम जी नरेगाची व जल युक्त शिवाराची कामे करण्यात येत असून अशा कामाच्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी दिल्या. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी  कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकाऱ्यांकडून त्यांना दिलेल्या उद्दिष्ट व त्यासाठी केलेल्या उपाययोजनाची माहिती जाणून घेवून योग्य त्या सूचनाही त्यांनी केल्या.

          या बैठकीस विभागीय वन अधिकारी अमोल सातपूते, सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी  अनिल ढानापणे,  सी. वाय. पाटील, शरद राठोड, डी. पी. देशपांडे, व्ही. एस. जगदाळे, डी. जी. वाघ, व्ही.पी. कच्छवे गिरीष क्षीरसागर यांच्यासह  संबंधित यंत्रणेचे अधिकारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा