सोमवार, १७ एप्रिल, २०१७

पोलीस कर्मचाऱ्यांच्या तणावमुक्त जीवनासाठी प्रयत्न करु - पालकमंत्री





                    
            बीड, दि. 17 :- राज्यातील शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीसावर मोठी जबाबदारी असल्यामुळे  त्यांना तणावात जीवन जगावे  लागते. पोलीसांना तणावमुक्त जीवन जगता यावे यासाठी त्यांना  आवश्यक  असणाऱ्या सर्व सोई सुविधा शासनस्तरावरुन  मिळवून  देण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
            माजलगाव येथील 12 कोटी 26 लाख 60 हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन माजलगाव ग्रामीण आणि पोलीस वसाहतीच्या इमारतीचे फित कापून उदघाटन पालकमंत्री ना. मुंडे यांच्या हस्ते  करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास आमदार आर.टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, नगराध्यक्ष सहाल चाऊस, उप नगराध्यक्षा सुमनताई मुंडे, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाल्या की, शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून जिल्हयासाठी मोठयाप्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून या निधीतून होणारी कामे उत्कृष्ट व दर्जेदार झाली पाहिजेत. मागील वर्षी जिल्हयात पाणी टंचाई मोठया प्रमाणात होती. जिल्हयात जलयुक्त शिवार योजनेची कामे झाल्यामुळे  जमिनीतील पाण्याचा साठा वाढल्यामुळे दरवर्षीप्रमाणे  जिल्हयाला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा  प्रश्न कमी झाल्याचे दिसून येत आहे.  बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून या रस्ते विकासाच्या कामामुळे दळणवळणाची साधने समृध्द होणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्हयात पोलीस विभागाची प्रलंबित असलेली विविध कामे सोडविण्यासाठी शासनस्तरावरुन निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हयातील पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारत व पोलीस निवास्थानाची कामेही हाती घेण्यात आली असून ही कामे लवकरच पुर्ण होतील.  सध्या पोलीस कर्मचाऱ्यांना 1 बीएचके निवासस्थान मिळते  हे निवासस्थान त्यांच्या कुटुंबियासाठी  अपूरे पडत असल्यामुळे यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. त्यांना 2 बीएचके निवासस्थान मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. पोलीसांचे फिटनेस चांगले राहिल्यास त्यांचा जनतेवर चांगला धाक राहण्यास मदत होते. यासाठी त्यांनी काम करत असलेल्या ठिकाणी व्यायामशाळेच्या सुविधा निर्माण कराव्यात. पोलीसांनी जनतेमध्ये त्यांच्या वर्दीचा आदर राहील यादृष्टीने कामे केली पाहिजेत. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे यासाठी पोलीस प्रशासनाचे नागरिकांशी संबंध चांगले असले  पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी बोलतांना औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी पोलीसांची भूमिका फार म्हत्वाची आहे. कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी पोलीसांना नेहमी सतर्क राहून कामे करावी लागतात तसेच पोलीस दलाच्या मुलभूत सेवा-सुविधांच्या कामांची माहिती देत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या प्रश्नांविषयी लक्ष वेधून हा प्रश्न शासनस्तरावरुन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
            यावेळी माजलगावचे आमदार आर.टी. देशमुख यांचेही समयोचित भाषण झाले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवासस्थानाच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

            पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील पोलीस दलाच्या नवीन प्रशासकीय इमारती, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या निवासस्थाने व इतर सोई सुविधाविषयी सविस्तर माहिती दिली.    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उप निरीक्षक प्रियंका फड यांनी केले तर आभार अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांनी मानले. या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.हरी बालाजी एन., उप विभागीय अधिकारी महेंद्र कांबळे,  तहसीलदार एन.जी झंपलवाड,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  पाटील आदि मान्यवर पोलीस अधिकारी  कर्मचारी तसेच प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा