रविवार, १६ एप्रिल, २०१७

श्रीक्षेत्र गहिनीनाथगड परिसराच्या विकासासाठी 25 कोटीचा आराखडा - पालकमंत्री पंकजा मुंडे




बीड, दि. 16 :- बीड जिल्ह्यातील चिंचोली ता.पाटोदा येथील श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाच्या परिसर विकासासाठी 25 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड परिसराच्या विकास प्रश्नासंबंधी पालकमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार विनायक मेटे, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार भिमराव धोंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर.टी.देशमुख, आमदार लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे आदि मान्यवर उपस्थित होते.
तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची निवड करण्यात आली असून या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्यानेया परिसराच्या विकास कामांचा जवळपास 25 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलतांना ना.मुंडे म्हणाल्या की, गडाच्या परिसरात भाविकांच्या सोईसुविधांसाठी रस्ते, भक्त निवास, भोजनालय, पाण्याची व्यवस्था, शौचालय इत्यादी प्रकारच्या कामांचा समावेश आराखड्यात करण्यात यावा याशिवाय गडाला जोडणाऱ्या इतर रस्त्यांच्या बांधकामाचा स्वतंत्रपणे 9 कोटी रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करुन शासनाला पाठवावा. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.

सध्या गहिनीनाथगड परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या 2 कोटी 87 लाख रुपयांच्या कामांचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. आराखड्याशिवाय इतर विकास कामांचे प्रस्ताव इतर विभागांमार्फत करण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले. बैठकीत  श्रीक्षेत्र नारायणगड आणि श्रीक्षेत्र कपिलधारच्या विकासकामांविषयीही चर्चा करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा