रविवार, १६ एप्रिल, २०१७

विविध योजनांचा घेतला आढावा ग्रामविकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज - पालकमंत्री पंकजा मुंडे


बीड, दि. 16 :- बीड जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या योजनांचा आढावा घेतांना  पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याची गरज प्रतिपादन केली.
बीड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार विनायक मेटे, जयदत्त क्षीरसागर, संगीता ठोंबरे, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार, आर.टी.देशमुख, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार आदि मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग विविध योजना राबवित असल्याचे सांगून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेने शौचालय बांधकामात विभागात आघाडी घेतली असून विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल अभिनंदन केले. गतवर्षी 14 टक्के काम झाले होते आतापर्यंत जिल्ह्याने 52 टक्के शौचालय बांधकाम पूर्ण केले आहे. वडवणी तालुका हागणदारीमुक्त झाला असून आणखी तीन तालुके होण्याच्या मार्गावर आहेत. या कामांमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबतच पदाधिकारी व ग्रामपंचायतीनेही पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना.मुंडे यांनी केले.
स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत 11 ग्रामपंचायती पुरस्कारास पात्र ठरली असून त्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार करण्यात येणार आहे. या शिवाय रमाई घरकुल योजना, राजीव गांधी निवारा योजना, इंदिरा आवास योजना आदि योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांना हक्काचे घरकुल देण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री मुंडे यांनी या बैठकीत ग्रामविास विभागाच्या विविध योजनांच्या सविस्तर आढावा घेतला.
रुनबन मिशनचा आढावा
केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन या अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला.

या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावांच्या समुहाचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करण्याबरोबरच शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे तसेच कृषी व संलग्न क्षेत्रांचा विशेष प्राधान्याने विकास करणे अपेक्षित आहे. यासाठी राज्यात सात गावसमुहांची निवड करण्यात आली असून बीड जिल्ह्यातील सिरसाळा क्लस्टर आणि शेजारच्या 19 गावांच्या समुहाची निवड करण्यात आली आहे. या गावसमुहाच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना एक केंद्राभिमुख पध्दतीने राबविण्यात येत असून त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानूसार कार्यवाही करयात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा गावसमुहाची निवड शासनाने केली असल्याचेही पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा