शनिवार, २४ डिसेंबर, २०१६

शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रोचे काम गतीने पूर्ण होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी




            बीड  दि.24 :- पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतानाच भविष्याचा विचार करून 25 वर्षाचे नियोजन केले पाहिजे. पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक राजधानी म्हणून देशात ओळखले जाते. येथील वाढती लोकसंख्या पाहता मेट्रो कार्यान्वित होणे आवश्यक होते. आज पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होत असून मेट्रो प्रकल्पाचे काम अधिक गतीने सुरु करून कालमर्यादेत त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. शेती महाविद्यालयाजवळील मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
            पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘पुणे शहराची गेल्या काही वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे. औद्योगीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या विकासामुळे पुण्यात रोजगारासाठी देशभरातून लोक येतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास होण्याची आवश्यकता आहे. पुणे मेट्रो हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसीत करण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल आहे.
            पुणे मेट्रो प्रकल्प विविध कारणांमुळे रेंगाळला गेला पण केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सरकार असल्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पास मंजुरी देणे आणि आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करणे शक्य झाले. मेट्रो  प्रकल्प गतीने पूर्ण करून पुण्याच्या विकासाला अधिक गती देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नागरीकरणाचा वेग अतिशय झपाट्याने वाढला आहे. शहरावरील ताण कमी होण्यासाठी गावांचाही विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रुर्बन अभियान राबवले जात आहे. यामुळे ग्रामीण भागात शहरातील सुविधा, संधी उपलब्ध होतील. त्याच बरोबर रोजगारांची संधीही वाढतील. यामुळे गावांकडून शहरांकडे येणाऱ्या नागरिकांचा लोंढा कमी होईल. विकासाचा विचार करताना तात्कालिक फायद्यांचा विचार न करता दूरगामी विकासाचा विचार करायला हवा.
            पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘देशातील केवळ शहरांचा विकास चाललेला नाही तर ग्रामीण भागांचाही विकास सुरु आहे. त्यासाठी देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. आता विकासाच्या संकल्पना बदलत आहेत. त्यामुळे विकासाची परिमाणेही बदलण्याची आवश्यकता आहे.
निश्चलीकरण करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य ठरला असल्याचे सांगून  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील काळे धन,भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्धची ही लढाई आहे. यापुढेही याबाबत अधिक कठोर निर्णय घेतले जातील. या निर्णयामुळे त्रास जरूर झाला पण, भविष्यात त्रास होणार नाही. ज्यांनी अद्यापही काळे धन लपवून ठेवले आहे,त्यांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांना कठोर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
            पुण्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पुण्यात डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरातील शहरांमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय शहर आहे. जगभरातील उद्योजकांची गुंतवणुकीसाठी पुणे शहराला पहिली पसंती असते. पुणे शहर लवकरच स्टार्ट-अप कॅपिटल होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी स्मार्ट सिटी सारख्या महत्वकांक्षी योजनेच्या अभियानाची सुरवात पुणे शहरापासून केली. पुणे शहराच्या औद्योगिक विकासासाठी पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे,त्याच्या कामाला लवकरच सुरवात करण्यात येणार आहे. मेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणार आहे.
आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस असून आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले तर दुसरीकडे बऱ्याच वर्षापासून थांबलेले पुण्याच्या मेट्रोचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे. येत्या मार्चपर्यंत शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रो मार्गालाही मंजुरी देऊन त्याचेही भूमिपूजन पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा आणि मुठा नद्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ९०० कोटी रुपये दिले आहेत. या माध्यमातून या नद्यांचे पुनर्जीवन होणार आहे. पुणे शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून उत्तम असणाऱ्या पुण्याला सर्वोत्तम करणार असल्याची ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.
            केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू आपल्या भाषणात म्हणाले, ‘भारताच्या परिवर्तनाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. भ्रष्टाचार आणि काळे धन बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान विशेष प्रयत्न करत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने पंतप्रधानांच्या या निर्णयामागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. देशातील सामान्य जनता, गरीब तरुण,शेतकरी, स्त्रिया यांच्या विकासाला सरकारचे प्राधान्य आहे. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत योजनेला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या अभियानाचे व्याप्ती वाढून तन-मन व धनाचीही स्वच्छताही सुरु आहे. प्रत्येक योजनेत सामान्यांचा सहभाग वाढवण्यावर  सरकारचा भर आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होणार असून शहराच्या विकासाची ही सुरवात आहे.मुंबई नंतर पुणे हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहराच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करणार असल्याची श्री. नायडू यांनी सांगितले.
            प्रास्ताविकात पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याची ओळख आता विस्तारत आहे. औद्योगिक क्षेत्रातही पुणे अग्रक्रमावर आले आहे.पीएमआरडीएच्या माध्यमातून पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. मेट्रोमुळे शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अधिक गतिमान होऊन त्याचा शहराच्या विकासावर सकारात्मक परिणाम होणार आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला पुणे शहराने चांगला प्रतिसाद दिला असून या योजनेंतर्गत सर्वात जास्त शौचालय बांधण्याचा विक्रम झाला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने विविध योजनांच्या माध्यमातून पुणे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.
            यावेळी खासदार सर्वश्री संजय काकडे, वंदना चव्हाण, अमर साबळे, आमदार सर्वश्री विजय काळे, भीमराव तपकीर, मेधाताई कुलकर्णी, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, विजय काळे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे,नीलमताई गोऱ्हे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
०००


पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मेट्रो प्रकल्प, एमयुटीपी प्रकल्पांचे भूमिपूजन संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे भारताची जगाला नवी ओळख होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी



            बीड  दि.24 :- राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारे सरकार महाराष्ट्राला लाभले असून ते प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठत आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे राज्याचीच नव्हे तर देशाची जगाला नवी ओळख होईल. देशभरातील गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि दुरुस्ती करुन किल्ले पर्यटनाला चालना दिली जाईल याची सुरुवात महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपासून करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासनाची परंपरा पुढे नेली, त्याच धर्तीवर सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्य शासनातर्फे विकासाच्या योजना सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये 1 लाख 6 हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
            अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन, मेट्रो-2ब, मेट्रो-4, एमटीएचएल, कुर्ला-वाकोला उन्नत मार्ग, एमयुटीपी-3 व कलानगर जंक्शन उड्डानपुलाच्या कामांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर झालेल्या जाहिर सभेत पंतप्रधान श्री. मोदी बोलत होते.
व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे, मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर, ठाण्याचे महापौर संजय मोरे, खासदार सर्वश्री रावसाहेब दानवे, उदयनराजे भोसले, संभाजी राजे छत्रपती, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी मान्यवर उपस्थित होते.
            छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो, अशी आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात करुन पंतप्रधान यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांच्या अनेक पैलूंचा भारतीयांच्या जीवनावर प्रभाव दिसून येतो. संघर्षातून त्यांनी सुशासनाची उत्तम परंपरा पुढे नेली. ते पराक्रमी होते. उत्तम संघटन कौशल्य त्यांच्याकडे होते. जल व्यवस्थापनाची त्यांनी घालून दिलेले आदर्श आजही आपण सर्वांना मार्गदर्शक आहेत. आज जागतिक स्तरावर सागरी सुरक्षेला खूप महत्त्व दिले जात आहे. मात्र शेकडो वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सुरक्षेसाठी स्वत:चे आरमार सुरु केले. यातूनच त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची आपल्याला ओळख होते. आज जगभरात पर्यटनासाठी अनेक आदर्शवत अशी प्रतिके निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या त्या देशांची ही प्रतिके ओळख बनली आहे. जागतिक स्तरावर नोंद घेण्याजोगी अनेक पर्यटनस्थळे भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत. जगभरात पर्यटन व्यवसायाला आलेले महत्त्व लक्षात घेता भारतातही साहसी पर्यटनाला चालना देण्याकरिता केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून देशातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्यात येईल. त्याची सुरुवात महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपासून करु, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
            छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या कल्याणाकरिता आपले जीवन समर्पित केले. त्यापासून सामान्यांना प्रेरणा मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे. या स्मारकाची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असा विश्वास व्यक्त करुन पंतप्रधान पुढे म्हणाले की, सर्व समस्यांचे निराकरण हे विकासाच्या माध्यमातूनच होऊ शकते. गरीबांना त्यांचे अधिकार, बेरोजगारांना रोजगार आणि सामान्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी देशाचा विकास हा एकमेव मार्ग असून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन हाच केंद्रबिंदू ठेवून केंद्र शासनाने विकासाच्या विविध योजना सुरु केल्या आहेत. ज्या निवृत्तीवेतन धारकांना अल्प रक्कमेचे निवृत्तीवेतन मिळत होते, त्यांना आता किमान एक हजार रुपयांचे निवृत्तीवेतन देणारी योजना सुरु केली आहे. गरीबांना स्वस्त दरात औषधे मिळावी यासाठी जेनेरीक औषधांवर भर देण्यात येत आहे. दारिद्रय रेषेखालील नागरिकांना गॅस कनेक्शन देण्याचा संकल्प केला असून येत्या तीन वर्षांत पाच कोटी लोकांना उज्वला योजनेच्या माध्यमातून कनेक्शन देण्यात येणार आहे. देशातील 18 हजार गावे विजेपासून वंचित असून एक हजार दिवसांत ही गावे वीज पुरवठ्याने जोडली जाणार आहे. त्यातील निम्मी गावे वीजेने जोडली गेली आहे. मी देशाच्या 125 कोटी लोकांना विश्वास देतो की, देश बदलत आहे, देश पुढे जात आहे आणि आपला देश जगासमोर उंच मानेने उभा राहत आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.
राज्य सरकारने सामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून विकासाच्या अभिनव योजना सुरु केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबईमध्ये आज ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले, ते सर्व प्रकल्प एक लाख 6 हजार कोटी रुपयांचे असून मुंबईच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे, असा गौरवोग्दार पंतप्रधानांनी काढले.
            8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्या विरोधात सुरु केलेल्या लढाईत देशातील सामान्य नागरिकांनी साथ दिली. नोटबंदी निर्णयाच्या विरुध्द अनेक अफवा पसरविल्या गेल्या मात्र देशाच्या विकासासाठी घेतलेल्या या निर्णयाला सामान्यांनी साथ दिली. ही लढाई सामान्य नाही. मुठभर भ्रष्ट लोकांमुळे देशातील सव्वाशे कोटी नागरिकांनी त्रास सहन केला. मात्र भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्या विरोधातील ही लढाई यापुढेही सुरुच राहिल. नोटबंदी निर्णयानंतरच्या 50 दिवसांनंतर सामान्य प्रामाणिक नागरिकांना होणारा त्रास कमी होवून जे अप्रामाणिक आहे त्यांच्या त्रासात वाढ होईल. म्हणून अशा अप्रामाणिक लोकांना माझे आवाहन आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही, देशाच्या कायद्याचा मान राखा. जे कायदा पाळणार नाही त्यांना देशातील जनताच धडा शिकवेल. देशाच्या भल्यासाठी हे स्वच्छता अभियान सुरु केले आहे. काळ्या धनाच्या विरोधात सुरु केलेली लढाई आपण जिंकत नाही तोपर्यंत अशीच सुरु राहील. देशवासियांनी आतापर्यंत दिलेली साथ व सहकार्य असेच कायम ठेवावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.
महाराष्ट्रात विकासाची कामे वेगाने प्रगतीवर असून वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र नवी उंची गाठत आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख करुन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
            जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले की,आमच्या राज्य शासनाने केंद्र शासनाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकास परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा केला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानतो की, त्यांनी या स्मारकाला परवानगी देण्यासाठी मदत केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामास जानेवारी 2017 मध्ये  सुरुवात होणार आहे.  ३५२ वर्षांपूर्वी याच महिन्यात याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे जलपूजन केले होते. आता याच दिवशी आपण अरबी समुद्रात शिवछत्रपतींच्या स्मारकाचे जलपूजन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा पुतळा नाही तर एक जिवंत वास्तू असणार आहे. त्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळणार आहे. अमेरिका हा देश ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’मुळे ओळखला जातो. आपला भारत देशही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे ओळखला जाईल, जगभरातून लोक शिवरायांना वंदन करायला मुंबईत येतील असा विश्वास व्यक्त करुन ते पुढे म्हणाले की, या स्मारकापासून शूरता, वीरता आणि सुप्रशासनाची प्रेरणा मिळेल. महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो मार्ग, उड्डाणपूल त्याचबरोबर रेल्वे व महाराष्ट्र शासनामध्ये होत असलेल्या सामंजस्य करारामुळे मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार असून मुंबई महानगर क्षेत्रामध्ये 200 किमी अंतराचे मेट्रोचे जाळे निर्माण केले जाणार आहे. मुंबईतील सर्व सार्वजनिक दळणवळण सेवा एकाच टिकीटावर आणून सामान्यांना सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो २ बी - डीएन नगर-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स-मानखुर्द, मेट्रो ४- वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली,  मुंबई ट्रान्स हार्बर लिंक,    कुर्ला-वाकोला उन्नत रोड, कलानगर जंक्शन उड्डाणपूल, एमयुटीपी-३ या प्रकल्पांचे व्यासपीठावरुन कळ दाबून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी संबंधित प्रकल्पांची ध्वनीचित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासन व रेल्वे विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की, ‘रेल बढे, देश बढे’, असेच मी या निमित्ताने सांगीन. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातील वातावरण शिवमय झाले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना आज रेल्वेची मोठी भेट दिली आहे. आजच्या दिवशी  राज्य शासनाबरोबर रेल्वेने 55 हजार कोटी रुपयांचे दोन सामंजस्य करार केले आहेत. यामुळे आगामी काळात लोकांच्या जीवनात बदल होणार आहे.
            अरबी समुद्रात जागतिक दर्जाचे शिवस्मारक होत आहे याचा मला आनंद होत आहे असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुवर्णाक्षरांनी लिहीला जावा असाच दिवस आहे. भारतात शिवशाही साकार व्हावी असे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. मुंबई बदलत असून महाराष्ट्रात तीन लाख कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे येत्या पाच वर्षांत करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, आज मी इथे शिवरायांना वंदन करायला आलो आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आपण पुढे जात आहोत. तंत्रज्ञान व बुद्धिमत्तेचा वापर करुन महाराजांनी त्या काळात सिंधुदुर्ग किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले केंद्रिय पुरातत्व खात्याकडून महाराष्ट्र राज्यांकडे द्यावेत, अशी मागणी श्री. ठाकरे यांनी यावेळी केली. 
            प्रारंभी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्री. पाटील यावेळी म्हणाले की, आज सगळ्या भारतवासियांसाठी गौरवाचा दिवस आहे. छत्रपतींच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे. आपल्या देशाचे अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांमुळे असून येत्या काळात तयार होणारे शिवस्मारक हे आगामी पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.
            या सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील सदस्य, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, राज्यातील विविध राजघराण्यांतील सदस्य तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप भिडे यांनी केले. या सोहळ्याच्या सुरुवातीस शाहिर नंदेश उमप आणि कलाकारांनी शिवराज्याभिषेक सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केला.

अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जल-भूमिपूजन







राज्यपाल श्री. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे व उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
            बीड  दि.24 :- अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नियोजित स्मारकस्थळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
            राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजी राजे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पंतप्रधान श्री. मोदी यांनी कलशांचे पूजन केले. त्यानंतर पंतप्रधान श्री. मोदी यांच्यासह मान्यवरांनी नद्यांचे पाणी व गडकिल्ल्यांची पवित्र माती नियोजित स्मारकस्थळी अर्पण केली. श्रीराम विवेक देवधर गुरुजी यांनी भूमिपूजन विधी पार पाडला.
            स्मारकाच्या नियोजितस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीत बसलेला पुतळा उभारण्यात आला होता. 
मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कलश सुपुर्द
            कार्यक्रमाच्या प्रारंभी गिरगाव चौपाटी येथे झालेल्या कार्यक्रमात समारंभासाठी  राज्यभरातून  आणण्यात आलेल्या नद्यांचे जल आणि प्रमुख गडकिल्ल्यांच्या पवित्र मातीचे कलश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपुर्द केले.
            याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, सार्वजनिक  बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पाटील पोटे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, खासदार रावसाहेब दानवे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार राज पुरोहित, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक, गड किल्ले संवर्धनाचे काम करणारे संभाजीराव भिडे गुरुजी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

            कलश सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान श्री. मोदी यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व विविध मान्यवर हावरक्राफ्टने हे कलश घेऊन अरबी समुद्रातील स्मारकाच्या नियोजित स्थळाकडे रवाना झाले.           या कार्यक्रमानिमित्त गिरगांव चौपाटीवर शिवकालीन आरमाराचे चित्र उभे करण्यात आले होते. याठिकाणी भव्य समारंभदेखील आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला पंतप्रधान श्री. मोदी यांच्यासह मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या उपस्थित जनतेने यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत जल्लोष केला.

पाताळगंगा येथील एनआयएसएमच्या नवीन संकुलाचे उद्घाटन बॅाण्डसच्या माध्यमातून शहरांच्या विकासासाठी निधी मिळावा भांडवली बाजाराचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

            

            बीड  दि.24 :- राज्यातील किमान 10 स्मार्ट शहरे म्युनिसिपल बॅाण्डसच्या माध्यमातून विकसित व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करत वित्तीय बाजाराचा लाभ शेतकऱ्यांना देखील मिळावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
            ते आज सेबीच्या राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थान (एनआयएसएम)च्या नव्या संकुलाचे उद्घाटन करतांना बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अरुण राम मेघवाल यांची उपस्थिती होती. पाताळगंगा (रायगड) औद्योगिक वसाहतीतील एनआयएसएम नव्या संकुलाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
            देशातील भांडवली ( वित्तीय) बाजाराकडून असलेल्या आपल्या अपेक्षा व्यक्त करतांना पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, आयपीओना चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते यशस्वी झाले असे आपण ऐकतो. पण आपल्या दृष्टीने मोठी संपत्ती निर्माण व्हावी हे अपेक्षित नाही तर खऱ्या अर्थाने भांडवली उत्पादकता वाढली पाहिजे. आपल्याकडे सरकार आणि बँका, वित्तीय संस्था या पायाभूत सुविधांसाठी नेहमी अर्थसहाय्य करतात मात्र हाच पैसा दीर्घकाळासाठी भांडवली बाजारातून मिळाला तर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा देशात तयार होतील. आपल्या सरकारने देशातील शहरे सुधारण्यासाठी चांगली योजना आणली आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी भांडवली बाजारातून शहरांच्या सुविधेसाठी पैसा उपलब्ध झाल्याचे आपण पाहिले नाही. देशातील किमान 10 स्मार्ट शहरांसाठी तरी असे बॉण्डस निघावेत, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
            कृषी क्षेत्राला देखील या भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा लाभ मिळाला तर यात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम पार पाडता येतील आणि त्याचा फायदा शेतकरी आणि ग्रामस्थांना होईल असे सांगून पंतप्रधानांनी राष्ट्रीय कृषी मंडीचा (इनाम) उल्लेख केला. कमोडीटी मार्केटमधून शेतकऱ्यांसह देशालाही अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.  
            पंतप्रधान म्हणाले की, भांडवली बाजारातून कराच्या स्वरूपात पुरेसा पैसा सरकारकडे जमा होत नाही. कदाचित हा कर प्रणालीतील काही त्रुटींचा भाग असू शकतो पण आपल्याला प्रामाणिक, परिणामकारक आणि पारदर्शी व्यवस्था निर्माण करायची आहे जेणे करून एक जागतिक दर्जाचा भांडवली बाजार निर्माण होऊन तो देशाला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो.

     पंतप्रधानांनी आपल्या भाषणात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नुकत्याच उचललेल्या पावलांचा उहापोह केला. ते म्हणाले की, वित्तीय तुट प्रचंड प्रमाणात वाढली होती, रुपयाचे देखील अवमूल्यन झाले होते, जगात देशाची आर्थिक पत घसरली होती. परकीय गुंतवणूकदार देशात गुंतवणूक करण्यास तयार नव्हते. आम्ही तीन वर्षांपेक्षाही कमी काळात वित्तीय चित्र बदलवण्यास सुरुवात केली. परकीय चलन वाढले, रुपया वधारला,चलन फुगवटा कमी झाला. सार्वजनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली. आता तर वस्तू व सेवा कर लागू करण्यातले काही अडथळे दूर करून लवकरच नवी कर प्रणालीही लागू होईल. ईज ऑफ डुईंग बिझिनेसमुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदार परत एकदा आपल्या देशाकडे वळले. विक्रमी अशी परकीय गुंतवणूक देशात व्हायला सुरुवात झाली. चलनबंदीच्या आमच्या निर्णयाची तर विरोधकांनी देखील प्रशंसा केली आहे. आम्ही कुठल्याही राजकीय लाभासाठी नव्हे तर देशासाठी दीर्घ काळ फायद्याचे ठरेल असे आर्थिक धोरण राबवीत आहोत.

            देशातील युवा शक्ती ही आमची ताकद असून सेबीने एनआयएसएमच्या माध्यमातून भांडवली बाजारातील गुंतवणूक आणि संबंधित इतर प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरु केल्याबद्धल पंतप्रधानांनी सेबीचे अभिनंदन केले. ५ लाख प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना देण्याचे उद्दिष्ट ठेवून संस्थेने या तरुणांना या महत्वाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी दिली आहे असेही पंतप्रधान म्हणाले.
            केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली म्हणाले की, आम्ही काही महत्वाच्या वित्तीय सुधारणा करून गुंतवणूकदाराचा विश्वास परत मिळवला आहे. आधारचा विविधांगी उपयोग, वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करणे आणि चलनबंदी ही त्यातली काही पावले आहेत.
संलग्नता मिळवून देण्यासाठी कायदा - मुख्यमंत्री
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सेबीला त्यांच्या सर्व उपक्रमांना राज्य सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळत राहील असे आश्वस्त केले. ते म्हणाले की, सेबी ही जगातली सर्वात विश्वासार्ह नियंत्रक संस्था असून हे स्थान अनेक वर्ष पुढे टिकून राहील असा मला विश्वास आहे. एनआयएसएम ला संलग्नता मिळवून देण्यासाठी येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात निश्चितपणे तशा स्वरूपाचा कायदा केला जाईल असेही आश्वासन त्यांनी दिले. सेबीचे अध्यक्ष यु. के. सिन्हा यांनी प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात या संस्थेच्या उभारणीमागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. सेबीची वाटचाल दाखविणारे दृकश्राव्य सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले. या प्रसंगी जपान,मलेशिया, इराण, श्रीलंका, येथील शेअर बाजार आणि नियंत्रण बोर्डांचे प्रमुख व वित्तीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

००००

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन



            बीड  दि.24 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जल-भूमी पूजनासाठी तसेच मुंबई, पुणे येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर  भारतीय वायुदलाच्या खास विमानाने आगमन झाले.

            राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी पंतप्रधानाचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी केंद्रीय वित्त मंत्री अरूण जेटली, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पोलीस महासंचालक सतीश माथूर तसेच वरिष्ठ अधिकारी व सेना दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या तत्त्वांनुसारच राज्याचे प्रशासन यापुढेही चालविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबईदि. 23 : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखून दिलेल्या नियमांनुसार आणि रयतेचे राज्य या परिपाठाच्या आधारावर सेवकाच्या भूमिकेत राहूनच यापुढेही शासनाचा कारभार चालवू,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या जलपूजन व भूमिपूजन समारंभासाठी आणण्यात आलेले राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख गड-किल्ल्यांची माती व नद्यांचे जल कलश स्वीकारण्याचा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीदेशातील जनतेने पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती उद्या साकार होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जलपूजन व भूमिपूजनासाठी आणण्यात आलेली माती व जल यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐक्य जपले जाणार आहे. शिव छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन निवडणूकीला सामोरे गेलो आणि त्यांच्या आशिर्वादानेच महाराजांचा सेवक म्हणून सत्तेची सूत्रे हाती घेतली. महाराजांनी राजकारण आणि प्रशासन कसे असावे याचा परिपाक घालून दिलेला असून या तत्त्वानुसारच रयतेच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराजांनी आपल्याला अस्मिता आणि जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळेच आपण स्वदेश आणि स्वधर्म जिवंत ठेवू शकलो. जगभरातील लोक केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बघण्यासाठीच भारतात येतील असे भव्य स्मारक उभारण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांचे संवर्धनाचे काम राज्य शासनामार्फत सुरु असून यासाठी संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. या समितीच्या मार्फत रायगडाचे काम सुरु असून शिवनेरीच्या कामाला गती देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याने या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ उद्या त्यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या समारंभासाठी तमाम शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी राज्यभरातील 36 जिल्ह्यांतून प्रमुख गड-किल्ल्यांची माती व नद्यांचे जलाचे प्रत्येकी दोन याप्रमाणे 72 कलश त्या त्या जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. हे जल व मातीचे कलश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच्या निश्चित स्थळी या कलशातील माती व पाणीच्या सहाय्याने स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या निमित्ताने अवघी मुंबई शिवमय झाली असून त्यांचा इतिहास जपण्यासाठी निधी कमी पडू देणार नाहीअसे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सुरुवातीस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडेमहाराष्ट्राची लोकधारा आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटीलग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेकृषी मंत्री पांडुरंग फुंडकर,जलसंपदा मंत्री गिरीश महाजनसहकार मंत्री सुभाष देशमुखखासदार रावसाहेब दानवेआमदार राज पुरोहितॲड आशिष शेलार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार ॲड. आशिष शेलार व संजय भुस्कुटे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना नितिन देसाई यांची होती. यावेळी स्मारकाच्या वैशिष्ट्यांची चित्रफित दाखविण्यात आली.
००००

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने कॅशलेस प्रशिक्षण संपन्न






            बीड, दि.23 :-जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी कॅशलेस पध्दतीने कोणकोणत्या प्रकारे व्यवहार केले जाऊ शकतात याबाबतचे प्रशिक्षण जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, क्षेत्रीय कार्यालयाचे योगेश पोकळे यांनी मार्गदर्शन केले. कॅशलेस पध्दत कशा प्रकारे सोयीची आहे व यामुळे आपला वेळ कशा प्रकारे वाचु शकतो याबाबतचे सविस्तरपणे मार्गदर्शन संगणकीय सादरीकरणाद्वारे करण्यात आले. मोबाईल, इंटरनेट बँकिग, वॉलेट इत्यादीद्वारे आपण कशा प्रकारे कॅशलेस पध्दतीने व्यवहार करु शकतो याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणास जिल्हा कोषागार कार्यालयाचे कोषागार अधिकारी डी.डी. माडे , अप्पर कोषागार अधिकारी लहू गळगुंडे, श्री.तोडकर  व कोषागार कार्यालयातील कर्मचारी  तसेच जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी, सर्व उपकोषागार अधिकारी उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमीपूजन समारंभासाठी महाराष्ट्र सज्ज राज्यभरातील गडकिल्ल्यांची पवित्र माती आणि जल कुंभांचे चेंबूर येथे स्वागत राज्यभरातून आलेल्या हजारों शिवप्रेमींच्या उपस्थितीत मिरवणूकीस प्रारंभ





मुंबई, दि 23 : मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील नद्यांचे जल असलेले कलश आज सकाळी मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ संकलित करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत आज सकाळी चेंबूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरील मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार विनायक मेटे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन व जलपूजन होणार आहे. या स्मारकासाठी राज्यभरातील 36 जिल्ह्यांतून आणलेल्या 72 कलशांमधील पाणी चेंबूर येथे एकत्र करण्यात आले. त्यानंतर हे जल चेंबूरपासून शीव, दादर, परळ, लालबाग, गिरगाव मार्गे गेट वे ऑफ इंडिया येथे आणण्यासाठी मिरवणूकीस सुरवात झाली.  
आज सकाळी चेंबूर येथील मिरवणूकीदरम्यान अवघे वातावरण शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केल्यावर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जल्लोषाने परिसर निनादून गेला होता.

००००

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे गेवराईत उदघाटन मेहनत आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवता येते - सिनेअभिनेत्री कांची शिंदे




            बीड, दि.23 :- ग्लॅमरच्या दुनियेत सहज काहीच मिळत नसते यासाठी संघर्ष करण्याची क्षमता, मेहनत आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवता येते, असे प्रतिपादन प्रसिध्द सिनेअभिनेत्री मानसी ऊर्फ कांची शिंदे यांनी गेवराई येथील जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, बीड व आर. बी. अट्टल महाविद्यालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने  र.भ. अट्टल महाविद्यालयातील गोदावरी सभागृहात दि. 22 डिसेंबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाटन प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री कांची शिंदे आणि सिनेकलावंत डॉ. सुधीर निकम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन व पौर्णिमा मनोर यांच्या स्वागत गीताने करण्यात आले.
मंचावर सिनेकलावंत ॲड. प्रशांत जाधव, मेकअप आर्टिस्ट पवन साळवे, मिमिक्री आर्टिस्ट केशव बडे, उपप्राचार्य प्रा. व्ही. पी. सांगळे, उपप्राचार्या डॉ. रजनीताई शिखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सुहासिनी देशमुख, डॉ. प्रशांत मुदकोंडवार, प्रा. दिनकर थोरात, राष्ट्रीय खेळाडु व कोरीओग्राफर श्रीमती मंजू वासनिक आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थितांचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सुहासिनी देशमुख, डॉ. सचिन पगारे, रविंद्र खरात यांनी केले.  प्रास्ताविकात श्रीमती नंदा खुरपुडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.  उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. सुधीर निकम यांनी युवकांना कलावंत कसा घडतो याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र बरकसे यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी मानले.  कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवक, युवती, सांस्कृतिक कार्यक्रम प्रेमी उपस्थित होते.

महोत्सवात शास्त्रीय गायन, सितार, विना, तबला, बासरी, मृदंग, हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य, वक्तृत्व, लोकगीत, लोकनृत्य व एकांकिका सादर झाल्या. महोत्सवासाठी परिक्षक म्हणून प्रा. प्रमोद झेंडेकर, प्रा. अविनाश तौर, प्रा. संतोष नागरे, विलास सोनवणे, शिवाजी गायकवाड, प्रा. दिपक जमदाडे, विष्णूप्रसाद खेत्रे, निशीकांत उदार, राधाकृष्ण वाघ, ऍ़ड. कमलाकर देशमुख, ऍ़ड. सुभाष निकम  यांनी काम केले.  महोत्सवातून विभागीय युवा महोत्सवासाठी जिल्ह्याचा निवडण्यात आलेला  संघ  मंगळवार दिनांक 27 डिसेंबर 2016 रोजी, विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय महोत्सवात सहभागी होईल. जिल्हास्तरीय युवा महोत्सवास प्रचंड प्रतिसाद लाभला. असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.