मुंबई, दि 23 : मुंबईच्या अरबी समुद्रात
उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या
स्मारकासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील नद्यांचे जल असलेले कलश आज सकाळी
मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ संकलित करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो
शिवप्रेमींच्या उपस्थितीत आज सकाळी चेंबूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरील
मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,गृहनिर्माण
मंत्री प्रकाश महेता, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार विनायक मेटे आदी
उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन व जलपूजन होणार
आहे. या स्मारकासाठी राज्यभरातील 36 जिल्ह्यांतून आणलेल्या 72 कलशांमधील पाणी चेंबूर
येथे एकत्र करण्यात आले. त्यानंतर हे जल चेंबूरपासून शीव, दादर, परळ, लालबाग, गिरगाव मार्गे गेट वे ऑफ
इंडिया येथे आणण्यासाठी मिरवणूकीस सुरवात झाली.
आज सकाळी चेंबूर येथील मिरवणूकीदरम्यान अवघे
वातावरण शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला उपस्थित
मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केल्यावर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जल्लोषाने
परिसर निनादून गेला होता.
००००



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा