शनिवार, २४ डिसेंबर, २०१६

पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मेट्रो प्रकल्प, एमयुटीपी प्रकल्पांचे भूमिपूजन संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे भारताची जगाला नवी ओळख होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी



            बीड  दि.24 :- राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारे सरकार महाराष्ट्राला लाभले असून ते प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठत आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे राज्याचीच नव्हे तर देशाची जगाला नवी ओळख होईल. देशभरातील गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि दुरुस्ती करुन किल्ले पर्यटनाला चालना दिली जाईल याची सुरुवात महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपासून करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासनाची परंपरा पुढे नेली, त्याच धर्तीवर सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्य शासनातर्फे विकासाच्या योजना सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये 1 लाख 6 हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
            अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन, मेट्रो-2ब, मेट्रो-4, एमटीएचएल, कुर्ला-वाकोला उन्नत मार्ग, एमयुटीपी-3 व कलानगर जंक्शन उड्डानपुलाच्या कामांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर झालेल्या जाहिर सभेत पंतप्रधान श्री. मोदी बोलत होते.
व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे, मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर, ठाण्याचे महापौर संजय मोरे, खासदार सर्वश्री रावसाहेब दानवे, उदयनराजे भोसले, संभाजी राजे छत्रपती, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी मान्यवर उपस्थित होते.
            छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो, अशी आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात करुन पंतप्रधान यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांच्या अनेक पैलूंचा भारतीयांच्या जीवनावर प्रभाव दिसून येतो. संघर्षातून त्यांनी सुशासनाची उत्तम परंपरा पुढे नेली. ते पराक्रमी होते. उत्तम संघटन कौशल्य त्यांच्याकडे होते. जल व्यवस्थापनाची त्यांनी घालून दिलेले आदर्श आजही आपण सर्वांना मार्गदर्शक आहेत. आज जागतिक स्तरावर सागरी सुरक्षेला खूप महत्त्व दिले जात आहे. मात्र शेकडो वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सुरक्षेसाठी स्वत:चे आरमार सुरु केले. यातूनच त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची आपल्याला ओळख होते. आज जगभरात पर्यटनासाठी अनेक आदर्शवत अशी प्रतिके निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या त्या देशांची ही प्रतिके ओळख बनली आहे. जागतिक स्तरावर नोंद घेण्याजोगी अनेक पर्यटनस्थळे भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत. जगभरात पर्यटन व्यवसायाला आलेले महत्त्व लक्षात घेता भारतातही साहसी पर्यटनाला चालना देण्याकरिता केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून देशातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्यात येईल. त्याची सुरुवात महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपासून करु, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
            छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या कल्याणाकरिता आपले जीवन समर्पित केले. त्यापासून सामान्यांना प्रेरणा मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे. या स्मारकाची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असा विश्वास व्यक्त करुन पंतप्रधान पुढे म्हणाले की, सर्व समस्यांचे निराकरण हे विकासाच्या माध्यमातूनच होऊ शकते. गरीबांना त्यांचे अधिकार, बेरोजगारांना रोजगार आणि सामान्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी देशाचा विकास हा एकमेव मार्ग असून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन हाच केंद्रबिंदू ठेवून केंद्र शासनाने विकासाच्या विविध योजना सुरु केल्या आहेत. ज्या निवृत्तीवेतन धारकांना अल्प रक्कमेचे निवृत्तीवेतन मिळत होते, त्यांना आता किमान एक हजार रुपयांचे निवृत्तीवेतन देणारी योजना सुरु केली आहे. गरीबांना स्वस्त दरात औषधे मिळावी यासाठी जेनेरीक औषधांवर भर देण्यात येत आहे. दारिद्रय रेषेखालील नागरिकांना गॅस कनेक्शन देण्याचा संकल्प केला असून येत्या तीन वर्षांत पाच कोटी लोकांना उज्वला योजनेच्या माध्यमातून कनेक्शन देण्यात येणार आहे. देशातील 18 हजार गावे विजेपासून वंचित असून एक हजार दिवसांत ही गावे वीज पुरवठ्याने जोडली जाणार आहे. त्यातील निम्मी गावे वीजेने जोडली गेली आहे. मी देशाच्या 125 कोटी लोकांना विश्वास देतो की, देश बदलत आहे, देश पुढे जात आहे आणि आपला देश जगासमोर उंच मानेने उभा राहत आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.
राज्य सरकारने सामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून विकासाच्या अभिनव योजना सुरु केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबईमध्ये आज ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले, ते सर्व प्रकल्प एक लाख 6 हजार कोटी रुपयांचे असून मुंबईच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे, असा गौरवोग्दार पंतप्रधानांनी काढले.
            8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्या विरोधात सुरु केलेल्या लढाईत देशातील सामान्य नागरिकांनी साथ दिली. नोटबंदी निर्णयाच्या विरुध्द अनेक अफवा पसरविल्या गेल्या मात्र देशाच्या विकासासाठी घेतलेल्या या निर्णयाला सामान्यांनी साथ दिली. ही लढाई सामान्य नाही. मुठभर भ्रष्ट लोकांमुळे देशातील सव्वाशे कोटी नागरिकांनी त्रास सहन केला. मात्र भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्या विरोधातील ही लढाई यापुढेही सुरुच राहिल. नोटबंदी निर्णयानंतरच्या 50 दिवसांनंतर सामान्य प्रामाणिक नागरिकांना होणारा त्रास कमी होवून जे अप्रामाणिक आहे त्यांच्या त्रासात वाढ होईल. म्हणून अशा अप्रामाणिक लोकांना माझे आवाहन आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही, देशाच्या कायद्याचा मान राखा. जे कायदा पाळणार नाही त्यांना देशातील जनताच धडा शिकवेल. देशाच्या भल्यासाठी हे स्वच्छता अभियान सुरु केले आहे. काळ्या धनाच्या विरोधात सुरु केलेली लढाई आपण जिंकत नाही तोपर्यंत अशीच सुरु राहील. देशवासियांनी आतापर्यंत दिलेली साथ व सहकार्य असेच कायम ठेवावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.
महाराष्ट्रात विकासाची कामे वेगाने प्रगतीवर असून वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र नवी उंची गाठत आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख करुन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
            जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले की,आमच्या राज्य शासनाने केंद्र शासनाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकास परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा केला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानतो की, त्यांनी या स्मारकाला परवानगी देण्यासाठी मदत केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामास जानेवारी 2017 मध्ये  सुरुवात होणार आहे.  ३५२ वर्षांपूर्वी याच महिन्यात याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे जलपूजन केले होते. आता याच दिवशी आपण अरबी समुद्रात शिवछत्रपतींच्या स्मारकाचे जलपूजन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा पुतळा नाही तर एक जिवंत वास्तू असणार आहे. त्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळणार आहे. अमेरिका हा देश ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’मुळे ओळखला जातो. आपला भारत देशही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे ओळखला जाईल, जगभरातून लोक शिवरायांना वंदन करायला मुंबईत येतील असा विश्वास व्यक्त करुन ते पुढे म्हणाले की, या स्मारकापासून शूरता, वीरता आणि सुप्रशासनाची प्रेरणा मिळेल. महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो मार्ग, उड्डाणपूल त्याचबरोबर रेल्वे व महाराष्ट्र शासनामध्ये होत असलेल्या सामंजस्य करारामुळे मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार असून मुंबई महानगर क्षेत्रामध्ये 200 किमी अंतराचे मेट्रोचे जाळे निर्माण केले जाणार आहे. मुंबईतील सर्व सार्वजनिक दळणवळण सेवा एकाच टिकीटावर आणून सामान्यांना सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो २ बी - डीएन नगर-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स-मानखुर्द, मेट्रो ४- वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली,  मुंबई ट्रान्स हार्बर लिंक,    कुर्ला-वाकोला उन्नत रोड, कलानगर जंक्शन उड्डाणपूल, एमयुटीपी-३ या प्रकल्पांचे व्यासपीठावरुन कळ दाबून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी संबंधित प्रकल्पांची ध्वनीचित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासन व रेल्वे विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की, ‘रेल बढे, देश बढे’, असेच मी या निमित्ताने सांगीन. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातील वातावरण शिवमय झाले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना आज रेल्वेची मोठी भेट दिली आहे. आजच्या दिवशी  राज्य शासनाबरोबर रेल्वेने 55 हजार कोटी रुपयांचे दोन सामंजस्य करार केले आहेत. यामुळे आगामी काळात लोकांच्या जीवनात बदल होणार आहे.
            अरबी समुद्रात जागतिक दर्जाचे शिवस्मारक होत आहे याचा मला आनंद होत आहे असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुवर्णाक्षरांनी लिहीला जावा असाच दिवस आहे. भारतात शिवशाही साकार व्हावी असे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. मुंबई बदलत असून महाराष्ट्रात तीन लाख कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे येत्या पाच वर्षांत करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, आज मी इथे शिवरायांना वंदन करायला आलो आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आपण पुढे जात आहोत. तंत्रज्ञान व बुद्धिमत्तेचा वापर करुन महाराजांनी त्या काळात सिंधुदुर्ग किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले केंद्रिय पुरातत्व खात्याकडून महाराष्ट्र राज्यांकडे द्यावेत, अशी मागणी श्री. ठाकरे यांनी यावेळी केली. 
            प्रारंभी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्री. पाटील यावेळी म्हणाले की, आज सगळ्या भारतवासियांसाठी गौरवाचा दिवस आहे. छत्रपतींच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे. आपल्या देशाचे अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांमुळे असून येत्या काळात तयार होणारे शिवस्मारक हे आगामी पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.
            या सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील सदस्य, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, राज्यातील विविध राजघराण्यांतील सदस्य तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप भिडे यांनी केले. या सोहळ्याच्या सुरुवातीस शाहिर नंदेश उमप आणि कलाकारांनी शिवराज्याभिषेक सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा