शनिवार, २४ डिसेंबर, २०१६

शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रोचे काम गतीने पूर्ण होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी




            बीड  दि.24 :- पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतानाच भविष्याचा विचार करून 25 वर्षाचे नियोजन केले पाहिजे. पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक राजधानी म्हणून देशात ओळखले जाते. येथील वाढती लोकसंख्या पाहता मेट्रो कार्यान्वित होणे आवश्यक होते. आज पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होत असून मेट्रो प्रकल्पाचे काम अधिक गतीने सुरु करून कालमर्यादेत त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. शेती महाविद्यालयाजवळील मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
            पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘पुणे शहराची गेल्या काही वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे. औद्योगीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या विकासामुळे पुण्यात रोजगारासाठी देशभरातून लोक येतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास होण्याची आवश्यकता आहे. पुणे मेट्रो हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसीत करण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल आहे.
            पुणे मेट्रो प्रकल्प विविध कारणांमुळे रेंगाळला गेला पण केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सरकार असल्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पास मंजुरी देणे आणि आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करणे शक्य झाले. मेट्रो  प्रकल्प गतीने पूर्ण करून पुण्याच्या विकासाला अधिक गती देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नागरीकरणाचा वेग अतिशय झपाट्याने वाढला आहे. शहरावरील ताण कमी होण्यासाठी गावांचाही विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रुर्बन अभियान राबवले जात आहे. यामुळे ग्रामीण भागात शहरातील सुविधा, संधी उपलब्ध होतील. त्याच बरोबर रोजगारांची संधीही वाढतील. यामुळे गावांकडून शहरांकडे येणाऱ्या नागरिकांचा लोंढा कमी होईल. विकासाचा विचार करताना तात्कालिक फायद्यांचा विचार न करता दूरगामी विकासाचा विचार करायला हवा.
            पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘देशातील केवळ शहरांचा विकास चाललेला नाही तर ग्रामीण भागांचाही विकास सुरु आहे. त्यासाठी देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. आता विकासाच्या संकल्पना बदलत आहेत. त्यामुळे विकासाची परिमाणेही बदलण्याची आवश्यकता आहे.
निश्चलीकरण करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य ठरला असल्याचे सांगून  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील काळे धन,भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्धची ही लढाई आहे. यापुढेही याबाबत अधिक कठोर निर्णय घेतले जातील. या निर्णयामुळे त्रास जरूर झाला पण, भविष्यात त्रास होणार नाही. ज्यांनी अद्यापही काळे धन लपवून ठेवले आहे,त्यांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांना कठोर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
            पुण्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पुण्यात डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरातील शहरांमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय शहर आहे. जगभरातील उद्योजकांची गुंतवणुकीसाठी पुणे शहराला पहिली पसंती असते. पुणे शहर लवकरच स्टार्ट-अप कॅपिटल होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी स्मार्ट सिटी सारख्या महत्वकांक्षी योजनेच्या अभियानाची सुरवात पुणे शहरापासून केली. पुणे शहराच्या औद्योगिक विकासासाठी पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे,त्याच्या कामाला लवकरच सुरवात करण्यात येणार आहे. मेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणार आहे.
आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस असून आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले तर दुसरीकडे बऱ्याच वर्षापासून थांबलेले पुण्याच्या मेट्रोचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे. येत्या मार्चपर्यंत शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रो मार्गालाही मंजुरी देऊन त्याचेही भूमिपूजन पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा आणि मुठा नद्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ९०० कोटी रुपये दिले आहेत. या माध्यमातून या नद्यांचे पुनर्जीवन होणार आहे. पुणे शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून उत्तम असणाऱ्या पुण्याला सर्वोत्तम करणार असल्याची ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.
            केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू आपल्या भाषणात म्हणाले, ‘भारताच्या परिवर्तनाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. भ्रष्टाचार आणि काळे धन बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान विशेष प्रयत्न करत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने पंतप्रधानांच्या या निर्णयामागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. देशातील सामान्य जनता, गरीब तरुण,शेतकरी, स्त्रिया यांच्या विकासाला सरकारचे प्राधान्य आहे. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत योजनेला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या अभियानाचे व्याप्ती वाढून तन-मन व धनाचीही स्वच्छताही सुरु आहे. प्रत्येक योजनेत सामान्यांचा सहभाग वाढवण्यावर  सरकारचा भर आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होणार असून शहराच्या विकासाची ही सुरवात आहे.मुंबई नंतर पुणे हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहराच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करणार असल्याची श्री. नायडू यांनी सांगितले.
            प्रास्ताविकात पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याची ओळख आता विस्तारत आहे. औद्योगिक क्षेत्रातही पुणे अग्रक्रमावर आले आहे.पीएमआरडीएच्या माध्यमातून पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. मेट्रोमुळे शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अधिक गतिमान होऊन त्याचा शहराच्या विकासावर सकारात्मक परिणाम होणार आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला पुणे शहराने चांगला प्रतिसाद दिला असून या योजनेंतर्गत सर्वात जास्त शौचालय बांधण्याचा विक्रम झाला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने विविध योजनांच्या माध्यमातून पुणे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.
            यावेळी खासदार सर्वश्री संजय काकडे, वंदना चव्हाण, अमर साबळे, आमदार सर्वश्री विजय काळे, भीमराव तपकीर, मेधाताई कुलकर्णी, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, विजय काळे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे,नीलमताई गोऱ्हे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
०००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा