गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

स्वच्छता हीच सेवा मोहिम यशस्वीतेसाठी समाजातील सर्व घटकांनी सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह




           बीड, दि. 14:-  जिल्ह्यात स्वच्छता हीच सेवा मोहिम दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये प्रशासनाबरोबरच समाजातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवून श्रमदानाच्या माध्यमातून आपले शहर, गाव व आपला परिसर स्वच्छ करावा आणि ''स्वच्छता हीच सेवा'' ही मोहिम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात ''स्वच्छता हीच सेवा'' ही मोहिम राबविण्यासाठी बुधवारी आयोजित बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधूकर वासनिक,  डॉ.सुनिल भोकरे, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, गणेश निऱ्हाळी, विकास माने, कृषी विभागाचे श्री.गायकवाड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
          पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले की, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत 2 ऑक्टोंबर पर्यंत राज्यातील सर्व नागरी भाग हागणदारीमुक्त घोषित करण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले असून त्या अनुषंगाने शहरातील व ग्रामीण भागातील उघडयावर शौचास जाणाऱ्या नागरिकांचा शोध घेवून त्यांना वैयक्तिक घरगुती शौचालय अथवा सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. नागरिकांनी उघड्यावर शौचास जावू नये म्हणून त्यांना प्रवृत्त करण्यासाठी गुड मॉर्निग व गुड इव्हिनिंग पथके अधिक सक्रीय करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
          जिल्हयात स्वच्छ महाराष्ट्र अभियानातर्गंत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत ''स्वच्छता हीच सेवा'' ही मोहिम राबविण्यात येणार असून स्वच्छतेच्या माध्यमातून या मोहिमेचा शुभारंभ 15 सप्टेंबरपासून  करण्यात येणार आहे. दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात प्रशासनासह लोक सहभागाच्या माध्यमातून त्या त्या भागातील अस्वच्छ भाग स्वच्छ करण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार असून  शाळा, हॉस्पिटल, बसस्थानके, उद्याने, स्मारके, तलाव, पर्यटन स्थळे, स्वच्छतागृहाची व्यापक प्रमाणात सफाईचे काम करुन तो भाग तो परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्वनिशी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. या मोहीमेमध्ये सर्व यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सहभागी होवून आपले कार्यालय, परिसर स्वच्छ करावे असेही  जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले. या बैठकीस सर्व यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा