शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळणे अत्यंत गरजेचे - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह





          बीड, दि. 15 :- शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळणे अत्यंत महत्वाचे असून  यासाठी सर्वांनी फुटबॉल सारख्या मैदानी खेळाचा स्विकार करण्याची गरज आहे. जीवनात शिक्षणामुळे माणूस मोठा होतो असे न समजता खेळामूळेही नावलौकिक प्राप्त करु शकतो यासाठी शिक्षणाबरोबरच खेळालाही तेवढेच महत्व द्यावे तसेच सर्वांनी फुटबॉलकडे फक्त खेळ म्हणून न पाहता करिअर म्हणून पहावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले.
जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतात होत आहेत. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा ड्रिम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात मिशन 1 मिलियन हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा पोलीस मैदान बीड येथे महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन  अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय करुया या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्या  प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी विकास माने, शिवछत्रपती पुरस्कारार्थी प्रा.जनार्धन शेळके, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री.सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, राहूल दुबाले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्यानिमित्ताने राज्यात जवळपास 10 लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. देशात अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. फुटबॉलचे महत्व सर्वांनी समजून घ्यावे फुटबॉलच्या खेळामुळे आणि इतर खेळामुळे आपले शरीर तंदूरुस्त होवून आपले जीवन निरोगी राहण्यास मदत होत असते.
सर्वांनी अशा खेळाकडे वळण्याची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगून उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह व उपस्थित मान्यवरांनी पोलीस बॉईज व बीड जिल्हा फुटबॉल संघटनेच्या खेळाडूंचा परिचय करुन घेतला आणि जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी फुटबॉलला किक मारुन खेळाचा शुभारंभ केला.
यावेळी प्रा. जनार्धन शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खरपुडे यांनी आयोजित कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.  या कार्यक्रमास क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, अरविंद विद्यागर, क्रीडा मार्गदर्शक अजय पवार, संतोष बावळे, डी.के.चंदवडे, प्रशिक्षक प्रा.परवेज खान, माजी क्रीडा परिषद सदस्य प्रा.दिनकर थोरात यांच्यासह क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी, खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा