रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न







          बीड, दि. 17 :- मराठवाडा मुक्ती संग्राम  दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले.
          तत्पूर्वी प्रियदर्शनी उद्यानातील हुतात्मा स्मृतीस्तंभ येथे  जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, स्वातंत्र्य सैनिक बन्सीधर जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार विनायक मेटे, जिल्हा पोलीस अधीक्षक अजित बोराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला आदींनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी पोलीस विभागाच्यावतीने हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
          मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी परेड संचलन वाहनातून परेड पथकांचे निरीक्षण केले. यावेळी आर.सी.पी., पोलीस मुख्यालय बीड (पुरुष),पोलीस मुख्यालय बीड (महिला), गृहरक्षक दल पुरुष, बलभीम महाविद्यालय एन.सी.सी., के.एस.के. महाविद्यालय एन.सी.सी., सैनिकी विद्यालय, बंकटस्वामी महाविद्यालय एन.सी.सी., महिला गस्ती पथक, पोलीस बँड, अग्नीशामक दल आणि आरोग्य विभागाची रुग्णवाहिका आदि परेड संचलनात सहभागी झाले होते.
          यानंतर यशवंत महाविद्यालय, आदर्श विद्यालय, जि.प.प्राथमिक शाळा, सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
          यावेळी माजी आमदार उषाताई दराडे, अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
-*-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा