बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे - राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया




          बीड, दि. 20 :- पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच पद निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशी होणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेत, निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी चोखपणे जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज केल्या.
          बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नोव्हेंबर-डिसेंबर 2017 कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आयोजित आढावा बैठकीत श्री.सहारिया बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती.
          श्री.सहारिया म्हणाले, इतर निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये फरक आहे. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची संख्या अधिक असते. बीडमध्ये 690 ठिकाणी निवडणूक पार पडणार असून त्यासाठी 251 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. क्षेत्रीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी आपआपसात योग्य समन्वय ठेऊन आचारसंहिता, निवडणूक प्रक्रियेची योग्य अंमलबजावणी करावी. निर्भय, मुक्त, पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडावी, अशा सूचनाही श्री.सहारिया यांनी यावेळी केल्या. तसेच दि.21 व 22 सप्टेंबर रोजी नामनिर्देशनासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी, आवश्यक संगणक, संगणक चालक यांची योग्य व्यवस्था करावी. गर्दी होणार नाही तसेच गर्दी नियंत्रणात राहील, याबाबत प्रशासनाने कार्यवाही पार पाडावी. मतमोजणीच्या दिवशी वेळापत्रक जाहीर करुन त्यानुसार कार्यवाही करावी. त्याचबरोबर पहिल्यांदाच या निवडणुकीत निवडून आलेल्या विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र देण्यात येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत संगणकावर डाटा अपलोड करावा, असे निर्देशही श्री.सहारिया यांनी दिले. ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आहे, त्या ठिकाणी लोडशेडिंग आचारसंहिता कालावधीत म्हणजेच दि.9 ऑक्टोबरपर्यंत होणार नाही याची खबरदारी वीज वितरण कंपनीने घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी योग्य कार्यवाही केली असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
          सचिव श्री.चन्ने यांनी चिन्ह वाटप, पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्रे, केंद्रावरील व्यवस्था, ऑनलाईन नामनिर्देशन, खर्च अहवाल, जनजागृतीवर भर आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
          जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी जिल्हा प्रशासनाकडून दि.7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील 690 ग्रामपंचायतींसाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1031 ग्रामपंचायतींपैकी 690 ठिकाणी निवडणूका होत आहेत. यासाठी 2 हजार 224 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. 168 संवेदनशील तर अतिसंवेदनशील 79 मतदान केंद्रे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर आवश्यक मतदान यंत्रे आणि स्थिती याबाबतही माहिती दिली. प्रशासनाकडून जिल्ह्यात एकूण 11 आचारसंहिता पथक, 22 फिरते पथक आहेत, असेही सांगितले, वाहने, खर्च पथक, प्रतिबंधात्मक कार्यवाही, प्रशिक्षण याबाबतही सविस्तर सादरीकरण केले.
          प्रारंभी श्री.सिंह यांनी राज्य निवडणूक आयुक्त श्री.सहारिया आणि सचिव श्री.चन्ने यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. आभार उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी मानले.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा