गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

अन्नातून विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात कडक उपाययोजना - जिल्हाधिकारी नवल किशोर राम


          बीड, दि.25 :- सार्वजनिक समारंभात होणाऱ्या अन्नातून विषबाधेच्या घटना बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अशा घटना रोखण्यासाठी तालुका व गावपातळीवर कडक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपमुख्य अधिकारी, तहसीलदार तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
            अलिकडच्या काळात अन्नातून विषबाधा होण्याच्या घटना जास्त प्रमाणात घडत असून त्यामध्ये भोजन समारंभाच्या आयोजकाकडून अक्षम्य दूर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामधून भोजनाचा आस्वाद घेणाऱ्या अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सर्वसाधारण चित्र दिसून येत आहे. असे सांगून जिल्हाधिकारी राम यांनी अशा घटना होऊ नयेत यासाठी जनजागृतीबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे सांगितले. कायद्यानूसार अशा भोजन समारंभाच्या आयोजक संस्था अथवा व्यक्तींनी अन्न व औषध प्रशासनाकडून आवश्यक ती तपासणी करुन परवानगी घेणे आवश्यक आहे. भोजनाच्या नियोजित ठिकाणी आवश्यक ती स्वच्छता आणि व्यवस्था चोख ठेवणे गरजेचे असून भारतीय दंड विधानाच्या कलम 272 व 273 नूसार अशा विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे भविष्यात अशा घटना घडणार नाहीत असेही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सुचित केले.
            अशा घटना घडू नयेत यासाठी जिल्हास्तरावरुन मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात येतील. त्यानूसार उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी इतर अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी व ग्रामसेवक यांची बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करुन जनजागृती करावी अशी महत्वपूर्ण सुचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी अशा घटना रोखण्यासाठी गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात यावी अशी सुचना केली.
तंबाखु नियंत्रण करा

तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास हितकारक नसून या व्यसनापासून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी दूर रहावे असे आवाहन करुन जिल्हाधिकारी राम यांनी या बैठकीत सर्व शासकीय कार्यालये व शाळांना अचानक भेटी देवून तपासणी करण्याचे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना दिले. कायद्यामध्ये व्यसन करणाऱ्या नागरिकास दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानूसार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी असेही निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा