शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

महाराष्ट्र केसरी सईद अली चाऊस यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ






बीड, दि. 26 :- बीड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-2016 चा शुभारंभ बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राउंडवर महाराष्ट्र केसरी सईद अली चाऊस यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन झाला.   यावेळी  जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी बोलताना महाराष्ट्र केसरी पै. सईद चाऊस म्हणाले की, युवकांनी खेळामध्ये करियर करावे परंतु नोकरी लागल्यास खेळणे सोडून न देता कामाबरोबरच खेळालाही तितकेच महत्व द्यावे. पोलीस दलातील खेळाडूंनी कामाबरोबरच खेळाचा नियमित सराव करुन विभागाअंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या जिल्ह्याचे नांव उंच करावे असे सांगून या स्पर्धेतील खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर म्हणाले की, पोलीस विभागावर दैनंदिन कामाचा कायम ताण असतो. हा ताण दूर करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खेळ खेळल्यास त्यांचा ताण कमी होऊन  कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. खिलाडूवृत्तीने वागल्यास कर्तव्य बजावतानाही  खेळांचा कामामध्ये फायदा होतो. खेळाडू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे व औरंगाबाद येथे होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये बीड जिल्हयाचे नांव चमकवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
          प्रारंभी बीड पोलीस मुख्यालय, बीड पोलीस उपविभाग, अंबाजोगाई उपविभाग आणि आष्टी उपविभागाच्या संघांनी संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वीलीत करण्यात आली व राखीव पोलीस निरीक्षक संजय पाचपोळ यांनी खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल शेळके यांनी केले तर आभार अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांनी मानले.  ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा समारोप बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राउंडवर बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

या स्पर्धांच्या सुरुवातीला बीड व अंबाजोगाई विभागाच्या संघांमध्ये व्हॉलीबॉलचा दर्शनी सामना झाला. पाहुण्यांनी नाणेफेक रुन संघसदस्यांचा परिचय करुन घेतला व त्यांना शुभेच्छा दिल्या.                   या कार्यक्रमास पोलीस विभाग व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, क्रीडाप्रेमी नागरि‍क उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा