बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

क्रीडा दिन व क्रीडा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन


                  
बीड, दि. 24 :-जिल्ह्यातील शाळा, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, क्रीडा मंडळ, महिला मंडळ, विविध क्रीडा संस्थानी दि.12 ते 18 डिसेंबर क्रीडा सप्ताह व 29 ऑगस्ट 2016 रोजी मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगार) यांचा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने चर्चासत्रे, उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांच्या जीवनावर व्याख्यान आणि क्रीडा वातावरण निर्मितीसाठी अनुषंगीक उपक्रम आदि कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सोमवार दि.29 ऑगस्ट 2016 रोजी क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकूल येथे सकाळी 11 वाजता मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारीत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.  तसेच 2015-16 वर्षात शालेय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूचा सत्कार करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील अशा सर्व खेळाडूंनी आपल्या वैयक्तीक अर्जासोबत सहभाग व प्राविण्य मिळविलेल्या प्रमाणपत्राची प्रत क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 27 ऑगस्ट 2016 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी क्रीडा सप्ताह व मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगार) यांचा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास क्रीडा विभागाने सन 1997 पासून मान्यता दिली असून दि. 29 ऑगस्ट हा क्रीडा दिन आणि दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहानिमित्त शाळा, महाविद्यालयांनी आयोजन करावे.           जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा मंडळे, युवक मंडळे, विविध संस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करुन अहवाल जिल्हा क्रीडा कार्यालयास सादर करावा. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा