शुक्रवार, २२ जुलै, २०१६

बीड जिल्ह्यात 25.1 मि.मी. सरासरी पावसाची नोंद


          बीड - बीड जिल्ह्यात 22 जुलै 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 25.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाची आहे.
बीड-7.6 (141.0), पाटोदा-25 (255.0), आष्टी-13.6 (201.0), गेवराई-निरंक (187.2), शिरुरकासार-2 (156.3), वडवणी-19.5 (269.5), अंबाजोगाई-28.4 (228.4), माजलगाव-21.2 (261.7), केज- 35.6 (199.9), धारुर- 90.7 (208.7) तर परळी वैजनाथ- 32.6 (179.6) पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 208.0 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 242.3 मि.मी. सरासरी  पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 31.21 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
-*-*-*-*-



मंगळवार, १९ जुलै, २०१६

बीड जिल्ह्यात 7.7 मि.मी. सरासरी पावसाची नोंद


          बीड - बीड जिल्ह्यात 19 जुलै 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 7.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाची आहे.
बीड-4.1 (125.4), पाटोदा-6 (220.0), आष्टी-2.1 (184.4), गेवराई-5.1 (185.4), शिरुरकासार-6.3 (152.0), वडवणी-18 (247.5), अंबाजोगाई-7.6 (197.4), माजलगाव-6.5 (232.3), केज- 15.4 (158.6), धारुर- 6.3 (110.0) तर परळी वैजनाथ- 7.4 (138.6) पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 177.4 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 226.7 मि.मी. सरासरी  पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 26.62 टक्के पावसाची नोंद झाली आहे

शुक्रवार, १५ जुलै, २०१६

31 जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत एकाच क्षेत्रावर विविध पीकासाठी अनेकवेळा विमा भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



              बीड - पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम 2016-17 साठी  जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पी‍क विम्याची रक्कम 31 जुलैपर्यंत भरणा करावी. एकाच क्षेत्रावर विविध पीकासाठी अनेकवेळा विमा भरणा केल्याचे निर्शनास आल्यास अशा शेतकऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे पीक विमा भरताना  शेतकरी आणि बँकांनीही याबाबत दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
              जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम -2016 च्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गंगाधर बोकाडे, कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड, कृषी विकास अधिकारी डी. बी. बिटके यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उस्थित होते.
              यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा भरावा. बँकांनीही पीक विमा विहीत मुदतीमध्ये भरणा होण्यासाठी योग्य नियोजन करावे. पीक विमा भरण्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी एकाच क्षेत्रावर एका पीकासाठी पीक विमा भरणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी एकाच क्षेत्रावर विविध पीकासाठी अनेकवेळा विमा भरणा केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी बँकांनी दक्षता घ्यावी. एखद्या शेतकऱ्याने एकापेक्षा जास्त वेळा एकाच पीकासाठी वीमा काढला असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा विम्याला लाभ देऊ नये. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे स्पष्ट निर्देशही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिले.
              सध्या पेरणी झाली असून  शेतीच्या मशागतीची कामे सुरु असून या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा वाटप केल्यास शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यासाठी बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी बँकनिहाय पीक विमा वाटप तसेच कर्ज पुर्नगठन याबबाबत सविस्तर आढावा घेऊन योग्य त्या सूचना केल्या.
शेतकऱ्यांनी बँकेकडे पंतप्रधान पीक विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2016 अशी आहे. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून अशा शेतकऱ्यांनीही दिनांक 31 जुलै 2016 पर्यंत सादर करावेत. बँकांच्या शाखांनी कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांची विमा घोषणापत्रे विमा कंपनीस तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या बाबतीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 31 जुलै 2016 नंतरच्या कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत 15 दिवसांच्या आंत व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत 7 दिवसांच्या आंत सादर करावेत. तसेच कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांची विमा घोषणापत्रे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संबंधित विमा कंपनीस नोडल बँकेस विमा घोषणापत्रे प्राप्त झाल्यापासून 7 दिवसांत सादर करावयाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. तसेच जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील 7 वर्षाचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहिर झालेली 2 वर्ष वगळून ) गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चीत केले जाईल.
          पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जोखीमीची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता शेतकऱ्यांना पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट.हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान.  काढणी पश्चात नुकसान.स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानीसाठी भरपाई देण्यात येणार आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली.                                               

मंगळवार, १२ जुलै, २०१६

डाळी आणि जिवनावश्यक वस्तुंच्या साठा तसेच विक्रीबाबत व्यापाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी साठेबाजांवर कठोर कारवाई करणार -जिल्हाधिकारी नवल किशोर राम



बीड - जिल्हयातील डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी यांनी डाळी तसेच जिवनावश्यक वस्तुंचा साठा आणि विक्री याबाबत पारदर्शकता ठेवावी. जिवनावश्यक वस्तु विशेषत: डाळीची साठेबाजी आणि जादा भावाने विक्री करणाऱ्यांवर जिवनावश्यक वस्तु अधिनियमाअंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी  केल्या.
          जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार, प्रतिबंध व  जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राम बोलत होते. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत यांची उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हयामध्ये जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार, प्रतिबंध व  जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पुरवठा विभागामार्फत विशेष दक्षता घेण्यात येत आहे. या वस्तुंची साठेबाजी तसेच जादा दराने विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिवनावश्यक वस्तुंबाबत तक्रारी आल्यास संबंधितांवर धाडी टाकून त्यांच्यावर अधिनियमाअंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या सूचना  देण्यात आल्या असल्याची जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत डाळींचा रास्त भावाने पुरवठा करण्यात येणार असल्याने डाळीची आवक, साठा, विक्री याबाबतच्या नोंदी संबंधित व्यापाऱ्यांनी पारदर्शक आणि अद्ययावत ठेवाव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. ज्या व्यापाऱ्यांचे परवाना नुतनीकरण झाले नाही त्यांनी ते तातडीने करुन घ्यावे. तसेच विनापरवाना विक्री करणाऱ्यांची माहिती संकलित करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
          जिल्ह्ययातील जिवनावश्यक वस्तुंच्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील डाळी आणि इतर जिवनावश्यक वस्तुंच्या साठ्याची अद्ययावत माहिती आठ दिवसांत जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर कराव्यात. पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील साठेबाजांवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल शासनाला  सादर करण्यात येणार असल्याने पुरवठा विभागाने याबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास नियमित सादर कराव्यात सूचना अशाही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिल्या.

          या बैठकीस जिल्ह्यातील सर्व डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सोमवार, ११ जुलै, २०१६

आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त जिल्ह्यातील भाविकांसाठी 164 बसची व्यवस्था


        बीड -  आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागामार्फत जिल्ह्यातील भाविकांसाठी  164 बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
        आषाढी पंढरपूर यात्रा सन 2016  दि.10 ते 20 जुलै 2016 या दरम्यान असून एकादशीचा मुख्य दिवस शुक्रवार दि.15 जुलै व पौर्णिमा मंगळवार दि.19 जुलै 2016 असे आहेत. बींड जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी  पुढीलप्रमाणे तालुकानिहाय बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. बीड आगारातून 26, परळी आगारातून 23, धारुर आगारातून 19, माजलगाव आगारातून 17, गेवराई आगारातून 18, पाटोदा आगारातून 18, आष्टी आगारातून 18, अंबाजोगाई आगारातून 25 या प्रमाणे बीड विभागातून पंढरपूर यात्रेकरीता यावर्षी 164 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
        ज्या खेडेगावात बसकरीता आवश्यक प्रवाशी संख्या असेल तेथून पंढरपूर यात्रेकरीता जादा गाड्या सोडण्यात येतील या करीता गावाजवळील आगार प्रमुखाशी संपर्क साधावा. पंढरपूर येथील भिमा बसस्थानकावरील शेड क्र.3 मधून बीडकडे परतीला येणाऱ्या भाविकांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली असून या सेवेचा जिल्ह्यातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बीड राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

-*-*-*-*-

बीड जिल्ह्यात 6.9 मि.मी. सरासरी पावसाची नोंद


        बीड - बीड जिल्ह्यात 11 जुलै 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 6.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाची आहे.

बीड-5.6 (119.7), पाटोदा-10.5 (211.3), आष्टी-11.6 (180.6), गेवराई-12.9 (173.6), शिरुरकासार-5.7 (144.0), वडवणी-4 (221.5), अंबाजोगाई-6.2 (179.2), माजलगाव-5 (211), केज- 9 (141.7), धारुर- 5.3 (96.0) तर परळी वैजनाथ- निरंक (110.8) पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 115.3 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 185.2 मि.मी. सरासरी  पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 24.42 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

गुरुवार, ७ जुलै, २०१६

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी 11 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत



          बीड -  सन 2015-2016 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी व 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ त्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम बारा पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थींनींना महामंडळाकडून जेष्ठता व गुणक्रमांनूसार उपलब्ध निधीच्या अधिन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या शिष्यवृत्तीकरीता पात्र असलेल्या उमेदवारांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, मार्क मेमो, टि.सी., बोनाफाईड, रेशनकार्ड, फोटो इत्यादी कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादीत, सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे  सोमवार दि.11 जुलै 2016 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

मंगळवार, ५ जुलै, २०१६

6 जुलै रोजी जिल्हयातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

बीड - मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे नियम  142(1) अन्वये बीड जिल्हयात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी बीड जिल्हयातील (सीएल-2, सीएल-3, एफएल-2, एफएल-3, टीडी-1, एफएल-बीआर-2) इत्यादी अबकारी अनुज्ञप्ती दि.6 जुलै 2016 रोजी रमजान ईद सणानिमित्त संपुर्णत: बंद ठेवावी असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

        अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द नियमानूसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.

शुक्रवार, १ जुलै, २०१६

2 कोटी वृक्ष लागवड जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते बिंदुसरा प्रकल्प परिसरात वृक्षारोपण




 बीड-- एक जुलै या एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत बीडपासून जवळच असलेल्या  बिंदुसरा प्रकल्प परिसरात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
          यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
          यावेळी जिल्हाधिकारी नवल किशारे राम म्हणाले की, एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला 8 लक्ष 21 हजार वृक्षारोपणाचे  उद्दिष्ट देण्यात आले असले तरी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या सहकार्याने 10 लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील 1024 ग्रामपंचायतीमधून वृक्ष लागवडीसंदर्भात चांगल्या प्रकारची वातावरण निर्मिती करण्यात आली असून या कामामध्ये जनतेचा सहभागीही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे.  सर्व शासकीय विभाग, पदाधिकारी तसेच जनता यांच्या सहकार्यातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम बीड जिल्ह्यात 100 टक्के यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री राम यांनी यावेळी व्यक्त केला.

          बिंदुसरा प्रकल्प प्रकल्प परिसरात 2 हजार जांभूळ या वृक्षाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले असून सध्या पाऊस कमी प्रमाणात असल्याने 500 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. येत्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.