बीड - जिल्हयातील डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी यांनी डाळी तसेच जिवनावश्यक वस्तुंचा साठा आणि विक्री याबाबत पारदर्शकता ठेवावी. जिवनावश्यक वस्तु विशेषत: डाळीची साठेबाजी आणि जादा भावाने विक्री करणाऱ्यांवर जिवनावश्यक वस्तु अधिनियमाअंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार, प्रतिबंध व जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राम बोलत होते. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हयामध्ये जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार, प्रतिबंध व जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पुरवठा विभागामार्फत विशेष दक्षता घेण्यात येत आहे. या वस्तुंची साठेबाजी तसेच जादा दराने विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिवनावश्यक वस्तुंबाबत तक्रारी आल्यास संबंधितांवर धाडी टाकून त्यांच्यावर अधिनियमाअंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत डाळींचा रास्त भावाने पुरवठा करण्यात येणार असल्याने डाळीची आवक, साठा, विक्री याबाबतच्या नोंदी संबंधित व्यापाऱ्यांनी पारदर्शक आणि अद्ययावत ठेवाव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. ज्या व्यापाऱ्यांचे परवाना नुतनीकरण झाले नाही त्यांनी ते तातडीने करुन घ्यावे. तसेच विनापरवाना विक्री करणाऱ्यांची माहिती संकलित करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्ययातील जिवनावश्यक वस्तुंच्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील डाळी आणि इतर जिवनावश्यक वस्तुंच्या साठ्याची अद्ययावत माहिती आठ दिवसांत जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर कराव्यात. पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील साठेबाजांवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याने पुरवठा विभागाने याबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास नियमित सादर कराव्यात सूचना अशाही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा