बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९


महाराष्ट्राच्या यशात बीडचा मोठा वाटा
जलसाठ्यांच्या पुनरुत्थानात बीड जिल्हा देशात प्रथम

        बीड,दि,19 :- जलसंधारणामध्ये केलेल्या चांगल्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याने राष्ट्रीय पुरस्कार 2018 मध्ये मानाचे स्थान मिळविले असून बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा उचलत जलसाठ्यांचे पुनरुत्थान कामामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
           राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली असून याची माहिती क्षेत्रीय निदेशक केंद्रीय भूमिजल बोर्डाच्यावतीने देण्यात आली. पुरस्कारांचे वितरण 25 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलसंपदा, भूपृष्ठ वाहतूक, जहाज  बांधणी व गंगा पुनरुत्थान मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते होणार असून यावेळी बीड जिल्ह्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी श्री एम. डी. सिंह यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
           बीड जिल्ह्याला मिळालेल्या यशामध्ये  जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामविकास मंत्री  पंकजाताई मुंडे  यांचे कुशल मार्गदर्शन  व प्रयत्न  महत्त्वाचे ठरले आहेत. हे यश मिळविल्याचा आनंद जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी व्यक्त केला आहे. जलसाठ्याच्या पुनर्भरणासाठी शासकीय विभाग व यंत्रणांनी केलेल्या कामात  सातत्यपूर्ण प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग असून यासाठी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
         जलसाठ्यांचे पुनरुत्थान कामात यश मिळविताना जिल्हा प्रशासनाने यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. संबंधित यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, नियमित बैठका व सातत्याने पाठपुरावा करून कामे पूर्ण करण्यात आली. यासाठी सोशल मीडिया व माहिती तंत्रज्ञानाचाही आवश्यक तो  वापर करण्यात आला.
           राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये स्थान मिळविणारे राज्यातील जिल्हे व संस्था यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
सर्वोत्कृष्ट राज्य- महाराष्ट्र प्रथम पुरस्कार
          उत्कृष्ट काम करणारे जिल्हे म्हणून यात भूजल पुनर्भरण- अहमदनगर प्रथम पुरस्कार, नदीचे पुनरुत्थान - लातूर प्रथम आणि वर्धा द्वितीय पुरस्कार, जलाशयांचे पुनरुत्थान -बीड जिल्ह्याने प्रथम पुरस्कार मिळविला आहे.
उत्कृष्ट  ग्रामपंचायत मैड जि .सोलापूर
          उत्कृष्ट संशोधन व नवकल्पनेसाठी सदभावना ग्रामीण  विकास संस्था, वर्धा तिसरा पुरस्कार, पाण्याच्या संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम टीव्ही शो- जनता दरबार प्रथम पुरस्कार, जल संरक्षण सर्वोत्तम विद्यालय - एस सी गर्ल स्कूल निलंगा द्वितीय पुरस्कार , उत्कृष्ट वृत्तपत्र महाराष्ट्र -सिंचन विकास प्रथम पुरस्कार व लोकमत मीडिया द्वितीय पुरस्कार, बेस्ट वॉटर रेग्युलरिटी अथॉरिटीचा एमडब्ल्यूआरआरए संस्थेस प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
*-*-*-*-*-*-*


बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९


जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या गौरवाची
शासनाचे मुखपत्र "लोकराज्य" ने घेतली दखल

                बीड,दि. 13 :-(जिमाका) प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बीड जिल्हा देशात प्रथम ठरला, याबाबत जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या गौरवाची राज्य शासनाच्या मुखपत्र  ­'लोकराज्य' मधे दखल घेण्यात आली आहे.
                माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मुखपत्राच्या फेब्रुवारी 2019 च्या अंकाचे नुकतेच मुंबई येथे अमिताभ बच्चन आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 'शेती विकासाचा डिजीटल अध्याय', स्वच्छता ही सेवा आदी विषयावर असलेल्या या अंकामध्ये 'पीक विमा बीडचे यश' हा विशेष लेख प्रसिध्द झाला आहे. यातून योजनेच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली.
                जिल्हयातील विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करताना, श्री.सिंह यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वेग आला. यापैकी प्रधानमंत्री पिक विमा योजनेबाबत देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला.
                जिल्हयातील 6 लाख 51 हजार शेतकऱ्यांपैकी  5 लाख 43 हजार 200 अशा 83 टक्के शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत समावेश करुन बीड जिल्हा प्रशासनाने अव्वल कामगिरी केल्याने राष्ट्रीय पातळीवर ह्याची दखल घेण्यात आली.
                 'लोकराज्य' मध्ये  पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन, यासाठी नियोजन व जनजागृतीसह समाज माधमांचा प्रभावी वापर केल्याचे नमूद करुन यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करताना लाभार्थ्यांच्या भेटी, पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन व सूचना देखील महत्वाच्या ठरल्याआहेत.
             जिल्हाधिकारी कार्यालय,बीड येथे  जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना फेब्रुवारी 2019 चा 'लोकराज्य' चा अंक जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी दिला. यावेळी स्वीय सहाय्यक श्री. लिंबकर,माहिती अधिकारी किरण वाघ,दूरमुद्रकचालक श्रीमती बी.जी. अंबिलवादे, छायाचित्रकार कृष्णा शिंदे उपस्थित होते.  विविध लेख,प्रेरणादायी यशकथा असणा-या "लोकराज्य" मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 100 रुपये  असून या अंकाचे वर्गणीदार होण्यासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय,प्रशासकीय इमारत, नगर रोड,बीड येथे  संपर्क साधावा.
*-*-*-*-*-*

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९








विविध विकास कामांचा मुख्यमंत्र्‌यांच्या हस्ते थाटात शुभारंभ
बीडच्या विकासासाठी शासन कटिबद्ध   
                              - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            बीड, दि. 6 - देशपातळीवर बीड जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देणाऱ्या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जिल्ह्याला भरीव प्रमाणात शासनामार्फत निधी देण्यात आला आहे. यापुढेही बीड शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
            शहरातील मल्टीपर्पज क्रीडांगण येथे भुयारी गटार योजना,निवारा गृह, नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रस्ते, प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत ४४८ घरांची निर्मिती आणि सभागृह नामकरण अशा पाच विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण  श्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे होत्या. तर  यावेळी आमदार जयदत्त क्षीरसागर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नरेंद्र पाटील, सर्वश्री आमदार सुरेश धस, विक्रम काळे, आर.टी, देशमुख, भीमराव धोंडे, माजी आमदार बदामराव पंडित, साहेबराव दरेकर, नगराध्यक्ष  डॉ. भारतभूषण क्षीरसागर, पद्मश्री डॉ.वामन केंद्रे, सय्यद शब्बीर, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह,जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, कुस्तीपटू राहुल आवारे, क्रिकेटपटू सचिन धस यांची उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री म्हणाले, नगर पालिकेने स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव सभागृहाला दिले. ही आनंदाची बाब आहे.  या जिल्ह्याच्या विकासासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी विशेष प्रयत्न करुन जिल्ह्याला देशपातळीवर नावलौकिक मिळवून दिला. शहराचा विकास झाला तरच मोठया प्रमाणात गुंतवणूक होऊन औद्योगिक क्रांती घडण्यास मदत होते. त्यातून रोजगार निर्मिती होते.  त्यामुळे राज्यातील शहरे चांगली असावीत. म्हणून राज्य शासनाने शहरीकरणाला प्राधान्य दिले. शहरात सर्व मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योगक्षेत्रही वाढीस लागण्यास मदत होते. केंद्र आणि राज्य सरकारने याबाबीला प्राधान्य देऊन बीड शहराच्या मुलभूत सोयी-सुविधांसाठी 495 कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेला दिला. पहिल्या टप्पयात हा निधी दिला आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातला निधीही नगरपरिषदेला उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री        श्री फडणवीस यांनी दिली.
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा संकल्प केला आहे.  राज्यानेदेखील या संकल्पपूर्तीसाठी पुढाकार घेतला असून प्राधान्याने  बेघरांना घर देण्याचे  काम करण्यात येत आहे.  त्यादृष्टीने ग्रामीण भागात पाच लाख लोकांसाठी घरे बांधून देण्यात आली आहेत. तसेच  आगामी काळात पाच लाख बेघरांना घरे बांधून देण्यात येतील. तसेच शहरातील झोपडपट्टीत  राहणाऱ्या गरीबाला पक्की घरे देण्याबरोबरच जमिनीची मालकी मिळावी, यासाठीही शासनाने निर्णय घेतला आहे.   स्मार्ट मिशन, अटल अमृत योजना, 14 व्या वित्त आयोगांतर्गतच्या योजना नगरविकास विभागामार्फत विकासाठी 21 हजार कोटी रुपयांपर्यंत निधीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            बीड जिल्हयाकडे दुष्काळी जिल्हा म्हणून पाहिले जाते. परंतु  राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार या योजनेमुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ झाला. तसेच  दुष्काळामुळे शेती उत्पादनात घट झाली. त्यांना शासनामार्फत आर्थिक मदत म्हणून पहिल्यांदाच दुष्काळाचे 600 कोटी रुपयांचे अनुदान सरकारने दिले आहे. हे अनुदान येत्या 15 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही संबंधित विभागाने तात्काळ करावी असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. 
            नुकताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपयांचे थेट अनुदान जमा करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयाचा गरीब शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना शेतीबरोबरच पशुंचे संवर्धन करणेही महत्वाचे असते.  दुष्काळी परिस्थिती पहाता येथील जनावरांना जगविण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरु करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला अधिकचे अन्नधान्य नियतन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पद्मश्री व रंगकर्मी वामन केंद्रे, गोपालक सय्यद शब्बीर, कुस्तीपटू राहुल आवारे, क्रिकेटपटू सचिन धस या बीडच्या सुपूत्रांचेही  कौतुक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 
            श्रीमती पंकजा मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड शहराच्या विकासासाठी 495 कोटी रुपयांचा भरीव निधी दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार पारदर्शकतेने जनतेपर्यंत विकास घेऊन जात आहे. त्याचबरोबर जिल्हा वासियांच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या रेल्वेचा प्रकल्प मंजूर करून यासाठी  दोन हजार 800 कोटी रुपयांची तरतूदही  केली आहे. बीडच्या विकासाला या शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात 950 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होत आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात एक हजार 100 किलोमीटरचे रस्ते होत आहेत. रस्त्यांच्या विकासातून जिल्हा समृद्धीकडे वाटचाल करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार 100 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे.  तसेच खरीपातील नुकसानभरपाई म्हणून शासनाने 616 कोटी रुपये मंजूर केले आहेत.  त्यापैकी 126 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. बीड जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील महिलांनीही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. महिला बचतगटांनी सुमतीबाई सुकळीकर योजनेचा लाभ घेऊन प्रगती करावी, असे आवाहनही श्रीमती मुंडे यांनी केले.
            याप्रसंगी आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस यांचीही भाषणे झाली.  शासन विकासाला प्राधान्य देत आहे.  बीड जिल्हा दुष्काळी जिल्हा असल्याने येथील शेतकऱ्यांना गहू आणि तांदूळ यांच्या वितरणात वाढ करावी, अशी मागणी केली.
            पद्मश्री डॉ.वामन केंद्रे, सय्यद शब्बीर, कुस्तीपटू राहुल आवारे, क्रिकेटर सचिन धस या बीडच्या भूमीपुत्रांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) मंगला डोंगरे, अनिता घायाळ, आवाईबाई सरपते, सरला मोताळे या  लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वाटपही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  
            सभेपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या सभागृहास लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे सभागृह अशा नावाने नामकरण करण्यात आलेल्या   कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.  यावेळी लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक यांची उपस्थिती होती.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले तर आभार विनोद मुळूक यांनी मानले.
*******







बीड येथील माता व बाल रूग्णालयाच्या इमारतीचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन

            बीड दि. 6:- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येथील जिल्हा रुग्णालयातील 100 खाटांच्या माता व बालसंगोपन केंद्राच्या (MCH-WING) इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे झाले.
            यावेळी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे , आमदार सर्वश्री जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, आर. टी. देशमुख, विक्रम काळे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती संतोष हांगे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे,पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, लातूर येथील आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी. पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिश हरदास, डॉ. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच आरोग्य उपसंचालक, लातूर डॉ. एकनाथ माले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन आणि माता व बालसंगोपन केंद्राच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
      या माता व बालसंगोपन केंद्राच्या इमारतीकरिता  मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ,राष्ट्रीय आरोग्य अभियान  यांनी 21 कोटी 5 लक्ष रूपये इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर 14 कोटी 15 लक्ष रूपयांच्या तांत्रिक मान्यतेसह निधी मंजूरही करण्यात आला आहे. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र 6 हजार 864 चौ.मी. इतके असणार आहे. याशिवाय या माता व बालसंगोपन केंद्राकरिता अतिरिक्त 200 खाटा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्याकरिता 6 हजार 993 चौ.मी. जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
*-*-*-*-*-*-*


मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९


अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर अधिक परिणामकारक
कारवाई  करण्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांचे आदेश

          बीड दि.4 :- जिल्हयामध्ये अवैध गौण खनिज अंतर्गत सन 2018-19 मध्ये  जानेवारी 2019 अखेर अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात एकूण 295 प्रकरणात कारवाई करण्यात आली असून 4 कोटी 17 लाख 41 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण 15 प्रकरणात गुन्हा दाखल करुन 2 आरोपी अटक करण्याची कारवाई करण्यात आली आहे. इतक्या मोठया प्रमाणावर कारवाई होवून देखील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक अधिक परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहेत.
          त्यानुसार बीड जिल्हयातील वाळू घाटामधून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक होऊ नये, यासाठी उपविभागातील वाळूघाट, नदीपात्रात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केलेले आहे. त्यामुळे या वाळूघाटामध्ये शासकीय वाहनाशिवाय इतर कुठल्याही वाहनास प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला आहे.
          अवैध गौणखनिजाची वाहतूक रोखण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी, बीट जमादार यांचे संयुक्त पथक गठीत करुन प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. तालुक्यात अशी चार-चार पथके गठीत केली आहेत. तसेच जिल्हा,उपविभाग व तहसिल स्तरावर भरारी पथके गठीत करण्यात आलेली आहेत.
          महसूल व वनविभाग महाराष्ट्र अध्यादेश क्र. 12 दि. 12 जून 2015 व दि. 12 जानेवारी 2018 मधील सुधारणेनुसार म.ज.म.अ. 1966 चे कलम 48(7) व (8) नुसार अवैध उत्खनन, वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन, यंत्रसामग्री ताब्यात घेणे तसेच हे वाहन, साधन यास शास्तीची रक्कम व वाहनातील, साठयातील अवैध गौणखनिजास दंड करण्याची तरतूद आहे. तसेच हे वाहन अवैध वाहतुकीसाठी वापरल्यास दंडात्मक कारवाई करुन म.ज.म.अ. 1966 चे कलम 48 पोटकलम (8)(2) नुसार अवैध उत्खनन, वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन, यंत्रसामग्री ताब्यात घेऊन वाहने, साधने दंडात्मक कारवाई करुन नियमानुसार जातमुचलका, शपथपत्र व दंडात्मक रक्कम भरणा केल्यास हे वाहन सोडण्याची तरतूद आहे. तसेच संबंधिताविरुध्द भारतीय दंड संहिता कलम 34,114,379,392,393,394,396 इत्यादी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीच्या अनुषंगाने कारवाई करताना महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांवर हल्ले होत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा अशा ठिकाणी संघटीत गुन्हेगारीचे प्रकार आढळून आल्यास त्याविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व त्यांचा विघातक कृत्यांना आळा घालणेबाबत अधिनियम (M.P.D.A) 1981 अन्वये कारवाई करण्याची तरतूद आहे.
          अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यात येत असून यापुढे अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर अधिक परिणामकारक कारवाई  करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले आहेत.
*-*-*-*-*-*-*


बुधवार, २३ जानेवारी, २०१९


जिल्हाधिकारी कार्यालयात
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

            बीड, दि. 23 :- जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी    यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेद्रंकुमार कांबळे, तहसीलदार के.ए.वाघमारे, तहसीलदार श्रीमती मनीषा तेलभाते,  नायब तहसीलदार चंद्रकांत जोगदंड, नायब तहसीलदार श्री.मंदे, नायब तहसीलदार श्री.महाजन, नायब तहसीलदार सय्यद कलीम आणि विविध शाखेतील अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.
             
-*-*-*-*-

                                 


गुरुवार, १७ जानेवारी, २०१९







वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली
राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजनेची बैठक संपन्न

जिल्हयातील विविध विकासासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे
यांनी केली 96 कोटी 97 लक्ष रुपयाची
अतिरिक्त निधीची मागणी

                 बीड, दि ,17 :-(जिमाका) जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 17 जानेवारी 2019 औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात संपन्न झाली.  बीड जिल्हयाच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेत 96 कोटी 97 लक्ष रुपयाची  अतिरिक्त वाढीव निधीची मागणी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली.
                 यावेळी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, नियोजन विभागाचे प्रधान सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. के. आगवाने आदींची उपस्थिती होती.
          सन 2019-20 यावर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 235 कोटी 83 लक्ष रुपयाची वित्तीय मर्यादा शासनाने ठरवून दिलेली आहे. परंतू बीड जिल्हयाच्या सर्वांगिंन विकासासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. जिल्हयातील कृषि व सलग्न सेवा, ग्राम विकास, सामाजिक सामुहिक सेवा, पाटबंधारे व पुरनियंत्रण, उर्जा, उद्योग व खाणकाम, परिवहन, सामान्य अर्थिक सेवा, टंचांई/नैसर्गिक आपत्ती , पशुसंवर्धन, नगरविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, सामान्य शिक्षण , आरोग्य, तंत्रशिक्षण या कामासाठी निधीची आवश्यकता आहे.
          यावेळी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात अनेक गुणवंत व चांगले खेळाडू आहेत.  या खेळाडूंना चालना मिळावी व राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून  राज्याचा तसेच जिल्हयाचा  नावलौकिक वाढवावा यासाठी क्रीडांगण विकासासाठी बीड जिल्हयाला अधिकचा निधी देण्याची मागणी करत बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून या शाळांच्या कामाचे उद्घाटन येत्या 26 जानेवारी रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतून अधिक दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अधिकचा निधी  देण्याची मागणीही पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी केली.
                जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी जिल्हा वार्षिक योजना 2019-20 चा तयार करण्यात आलेला प्रारुप आराखडयामध्ये जिल्हयाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधीची पॉवरपॉईंटच्या माध्यमातून मंत्री महोदयांना माहिती देत जिल्हयाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या वाढीव निधीची मागणी केली.  या बैठकीस जिल्हास्तरीय सर्व कार्यालयप्रमुख उपस्थित होते.
-*-*-*-*-*-


अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठीच्या योजनांचा लाभ
गरजू लाभार्थ्यांना होणे गरजेचे
                                                                                  

 - उपाध्यक्ष ज. मो.अभ्यंकर

                 बीड, दि ,17 :-(जिमाका) शासन अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवित असून या योजनांची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे असून अल्पसंख्यांक समाजातील गरजू लाभार्थी  या योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी अशा सुचना अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
                बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य अल्पंसख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी आज अल्पसंख्यांक समाजाच्या योजनांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, उपशिक्षणाधिकारी (मा.) श्रीमती उस्मानी नजमा, शिक्षणविस्तार अधिकारी व्ही.एन.राठोड, शासकीय तंत्रनिकेतन अधिविख्याता जे.एफ.सय्यद, शिक्षणविस्तार अधिकारी श्री. धोत्रे, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आ‍र्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक  सय्यद इम्रान काद्री, अ. का. सय्यद कलीम अहमद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
                  बीड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी विविध समाजाच्या मंडळांची  भेट घेतली. यावेळी विविध संघटना, संस्था व नागरिका कडून निवेदने उपाध्यक्षांना प्राप्त झालेल्या निवेदनाचा आढावा घेवून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना देवून                  या बैठकीत पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच अल्पसंख्यांक समाजातील गरजू लाभार्थ्यांना शिक्षणाच्या संधी वाढविणे, एकात्मिक बाल विकास सेवांची पुरेशी उपलब्धता शालेय शिक्षणाच्या उपलब्धतेत सुधारणा करणे, सर्व शिक्षा अभियान, उर्दू शिक्षणासाठी अधिक संसाधन, मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, अल्पसंख्यांक समुदायातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक संरचनेत सुधारणा करणे, तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्यवृध्दी, आर्थिक कार्यासाठी कर्जसहाय्य आदी बाबीवर आढावा घेऊन योग्य ते कार्यवाही करण्याच्या सुचना उपाध्यक्ष श्री. अभ्यकंर यांनी संबंधितांना केल्या.
-*-*-*-*-*-

बुधवार, १६ जानेवारी, २०१९








पाटोदा येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते
पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम व
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

                   बीड, दि ,16 :-  पाटोदा येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत व    निवासस्थान बांधकामाचे आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा  पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
                या कार्यक्रमास आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, जिल्हा परिषदेचे सभापती संतोष हंगे, पंचायत समिती सभापती पुष्पाताई सोनवणे, पाटोदा नगराध्यक्षा अनिता नारायणकर, उपसभापती संगीताताई मिसाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, प. स.सदस्य सुवर्णाताई लांबरुड, महेंद्र नागरगोजे,देविदास शेंडगे, विद्याधर येवले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता ए. एम. बेदरे, उपअभियंता डी. आर. साळवे, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्हयात ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात या सर्व पंचायत समितीच्या अद्यावत नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार असल्याने याचा फायदा सर्वांना होणार असून गरजू नागरिकांची कामेही वेळेत पूर्ण  होण्यास मदत होणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
                जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्याची कामे मोठया प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. येणाऱ्या काळात ज्या गावांची रस्त्यांची मागणी आहे त्या गावांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. असे सांगून  जिल्ह्यातील रस्त्याची कामे पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील गावांना तसेच नागरिकांना याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जात असून त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील नागरीक व शेतकऱ्यांना जोड व्यवसाय उभारण्यास मदत होईल.  महामार्गाच्या रस्त्यामुळे दळनवळणाची सुविधा चांगली झाल्याने नवीन उद्योगाची उभारणी होईल त्यामुळे त्या भागातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
                पाटोदा येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत दोन मजली असून या इमारतीच्या बांधकामासाठी 350 लक्ष रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच पंचायत समिती सभापती, अधिकारी, कर्मचाऱ्यासाठी एकूण 20 निवासस्थानाचे बांधकाम होणार असून यासाठी 460 लक्ष खर्चास प्रशासकीय मंजूरी प्राप्त आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यातील 424.43 कि.मी. लांबीची 95 कामे मंजूर असून या कामासाठी 250.55 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी पाटोदा येथे 356 लक्ष रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येणाऱ्या राज्यमार्ग 56 ते ढवळेवाडी रस्त्याच्या कामाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. तसेच पालकमंत्री पंकजा मुंडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांच्या महिलांना व पाटोदा पंचायत समितीकडून अपंग लाभार्थ्यांना शिलाई मशिन खरेदीसाठी आणि घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच सुवर्णपदक विजेता खेळाडू धनराज गंगाराम नागरगोजे याचाही मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
               यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आज भूमीपूजन झाल्यामुळे या भागातील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. तसेच जिल्हयातील सर्व पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला असल्यामुळे येणाऱ्या काळात सर्व तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या अद्यावत नविन इमारती तयार होतील, असे सांगून पाटोदा शहर पाणी पूरवठा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. पाझर तलाव दुरुस्तीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच जनावरांसाठी चारा छावण्या, नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी मनरेगाची कामे सुरु करण्याची  गरज आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
              यावेळी बोलताना भिमराव धोंडे म्हणाले की, जिल्हयात कमी पाऊसामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न  निर्माण झाला असून टँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. पाटोदा, आष्टी, शिरुर तालूक्यातील रस्त्याची कामे सुरु झाल्यामुळे त्या भागातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. असे सांगून त्यांनी पीकविमा, रोहयोच्या माध्यमातून विहीर मंजूरी, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूरी आदी प्रश्न  त्यांनी यावेळी उपस्थित केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांनी केले. या कार्यक्रमास या भागातील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-

मंगळवार, १५ जानेवारी, २०१९




जिल्हा वार्षीक नियोजन समितीच्या सभागृहामध्ये पालकमंत्री यांच्या
उपस्थितीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिक सपंन्न

         बीड, दि.15:- (जिमाका) दि. 15 जानेवारी 2019 रोजी जिल्हा वार्षीक नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी स्वत: ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनवर प्रात्यक्षिक करुन पाहिले व काचेच्या पारदर्शी स्क्रिनवर केलेल्या मतदानाची खात्री केली.
                  यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी या मशिन बद्दल यथोचित माहिती दिली. यावेळी खासदार डॉ.प्रितम मुंडे, आ.भिमराव धोंडे,आ.लक्ष्मन पवार,आ.आर.टी. देशमुख यांनीही ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनवर प्रात्यक्षिक करुन मतदानाची खात्री करुन घेतली व समाधान व्यक्त केले.
                 यावेळी आ.जयदत्त क्षीरसागर,आ.सुरेश धस,आ. संगिता ठोबंरे, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार,रमेश पोकळे,कुंडलिक खांडे,जि.प.सदस्य,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सर्व उपविभागीय अधिकारी,तहसिलदार, विविध खात्याचे विभाग प्रमुख इत्यादी उपस्थित होते.





दूष्काळी उपाययोजनांसह क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी भरीव तरतूद
                                    -- पालकमंत्री पंकजा मुंडे
·      जिल्हा नियोजन समितीची  2019- 20 च्या प्रारुप आराखडयास मंजूरी
·      अतिरिक्त 81 कोटी 97 लाखांच्या मागणीसह 327 कोटी 57 लाख रुपयांचा आराखडा

         बीड, दि.15:- (जिमाका) जिल्हयाच्या विकासासाठी  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून   मोठी आर्थिक तरतुद करीत असून त्याचा विनियोग तातडीने होणे गरजेचे आहे. दूष्काळी उपाययोजनासह विशेषता युवकांच्या व क्रीडा विकासाच्या बाबी लक्षात घेता याच मातीतील कुस्ती,मल्लखांब,कबड्डी, पोहणे आदी खेळांना प्रोत्साहन मिळेल अशा सोयीसुविधा संपन्‌न क्रीडांगणाचा विकास पायलट प्रकल्प म्हणून केला जावा, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.  
         जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण,अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्राचा सन 2019- 20 साठी 327 कोटी 57 लाखाचा प्रस्तावित तरतुदीसह एकूण 81 काटी 97 लाखाच्या विविध विभागाच्या अतिरिक्त मागण्यासह सादर करण्यात आलेल्या प्रारुप आराखडयास मंजूरी देण्यात आली.
         जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री  श्रीमती पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक संपन्‌न झाली. बैठकीस खासदार डॉ. प्रितम मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आ. जयदत्त क्षीरसागर, सुरेस धस, आ. भिराव धोंडे आ. लक्ष्मण पवार, आ.आर.टी देशमुख,आ. श्रीमती संगिता ठोंबरे, जिल्हाधिकारी एम.डी.सिह. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच समितीचे सर्व सन्माननिय सदस्य,विविध शासकीय विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
          प्रारुप आरखडयावरील चर्चेप्रसंगी बोलतांना श्रीमती मुंडे म्हणाल्या प्राथमिक शाळांचे वर्गखोल्यांच्या दूरुस्तीसाठी मोठी तरतूद केली असून त्यामुळे जिल्हयातील शाळांना नवे रुप प्राप्त होईल.अंगणवाडींचे बांधकाम करण्यासाठी देखील असणा-या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतांना केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्याने यापुढे अंगणवाडी बांधकामासाठी प्रीकास्टींग तंत्राचा वापर करण्यात येईल व यातुन जिल्हयासाठी मंजूर झालेल्या सर्व अंगणवाडयांचे बांधकाम केले जाईल याकडे यंत्रणेने लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले.
           पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या यंदा दुष्काळामुळे शासनापुढील प्राधान्यक्रम बदलेले आहेत. परंतू ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरव्दारे पाणी पुरवठा गरज असलेल्या गावांना व भागाला व्हावा यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन ते तालुकास्तरावर देण्यात आले आहेत. याचा फायदा वेळेत पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी होईल, असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.
         या प्रसंगी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी जिल्हयातील क्रीडा विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करु असे सांगितले. आ. लक्ष्मण पवार यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्धतेबाबत मागणी मांडली. आ. जयदत्त क्षीरसागर यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न जिल्हयात गंभीर असल्याची बाब सांगितली. आ. सुरेश धस यांनी जिल्हयासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कुकडीमधून पाणी घेण्याबाबत मागणी मांडली तसेच 2016 च्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या तलावांची दूरुस्ती होण्याची गरज मांडली तसेच यावेळी आ. आर.टी. देशमुख आ. श्रीमती संगिता ठोंबरे यासह विविध सदस्यांनी आपली मते मांडली.  
        यावेळी लोकसंख्येवर अधारित जिल्हयात 13 प्राथमिक आरोग्य केंद्र व 38 उपकेंद्रांच्या मंजूरीबाबत ठराव मांडण्यात आला व अध्यक्षाच्या मान्यतेने विविध विषयांवरील ऐनवेळेच्या दाखल ठरावानां मंजूरी देण्यात आली.                        
         जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी नाविन्यपूर्ण योजनेतून 11 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातुन वैशिष्टयपूर्ण कामांना चालना दिली जाईल असे सांगितले. यासह आज सादर केलेल्या प्रस्तावित तरतुदीमध्ये सर्वसाधारणसाठी 235 कोटी 83 लाख रुपये, जिल्हा वार्षिक उपयोजनांसाठी 89 कोटी 60 लाख रुपये, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्रासाठी 2 कोटी 14 लाख रुपयांचे नियोजन प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी बी.के. आगवाने यांनी जिल्हा वार्षिक योजनच्या आराखडयाचे सादरीकरण केले. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त  सचिन मडावी यांनी अनुसूचित जाती उपयोजनेचे सादरीकरण केले.
       प्रारुप आराखडयामध्ये राष्ट्रीय शाश्‍वत कृषी अभियान,कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान, सिंचन विकास, शेतकरी प्रशिक्षण आदिसांठी 13 कोटी 49 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली तसेच कृषी सलग्न सेवा, पशु संवर्धन, जलसंधारण यासाठी देखील भरीव निधी मंजूर करण्यात आला.वने, ग्रामविकास, नगरविकास, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य्‍, पाणीपुरवठा, मागसवर्गीयांचे कल्याण, महिला व बालविकास आदी कामांसाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी विविध शासकीय यंत्रणांनी मांडलेल्या 81 कोटी 97 लाख रुपयांच्या आतिरिक्त मागणी प्रस्तावांना देखील मान्यता देण्यात आली.
                                             *********