मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९


अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर अधिक परिणामकारक
कारवाई  करण्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांचे आदेश

          बीड दि.4 :- जिल्हयामध्ये अवैध गौण खनिज अंतर्गत सन 2018-19 मध्ये  जानेवारी 2019 अखेर अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात एकूण 295 प्रकरणात कारवाई करण्यात आली असून 4 कोटी 17 लाख 41 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण 15 प्रकरणात गुन्हा दाखल करुन 2 आरोपी अटक करण्याची कारवाई करण्यात आली आहे. इतक्या मोठया प्रमाणावर कारवाई होवून देखील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक अधिक परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहेत.
          त्यानुसार बीड जिल्हयातील वाळू घाटामधून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक होऊ नये, यासाठी उपविभागातील वाळूघाट, नदीपात्रात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केलेले आहे. त्यामुळे या वाळूघाटामध्ये शासकीय वाहनाशिवाय इतर कुठल्याही वाहनास प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला आहे.
          अवैध गौणखनिजाची वाहतूक रोखण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी, बीट जमादार यांचे संयुक्त पथक गठीत करुन प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. तालुक्यात अशी चार-चार पथके गठीत केली आहेत. तसेच जिल्हा,उपविभाग व तहसिल स्तरावर भरारी पथके गठीत करण्यात आलेली आहेत.
          महसूल व वनविभाग महाराष्ट्र अध्यादेश क्र. 12 दि. 12 जून 2015 व दि. 12 जानेवारी 2018 मधील सुधारणेनुसार म.ज.म.अ. 1966 चे कलम 48(7) व (8) नुसार अवैध उत्खनन, वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन, यंत्रसामग्री ताब्यात घेणे तसेच हे वाहन, साधन यास शास्तीची रक्कम व वाहनातील, साठयातील अवैध गौणखनिजास दंड करण्याची तरतूद आहे. तसेच हे वाहन अवैध वाहतुकीसाठी वापरल्यास दंडात्मक कारवाई करुन म.ज.म.अ. 1966 चे कलम 48 पोटकलम (8)(2) नुसार अवैध उत्खनन, वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन, यंत्रसामग्री ताब्यात घेऊन वाहने, साधने दंडात्मक कारवाई करुन नियमानुसार जातमुचलका, शपथपत्र व दंडात्मक रक्कम भरणा केल्यास हे वाहन सोडण्याची तरतूद आहे. तसेच संबंधिताविरुध्द भारतीय दंड संहिता कलम 34,114,379,392,393,394,396 इत्यादी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीच्या अनुषंगाने कारवाई करताना महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांवर हल्ले होत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा अशा ठिकाणी संघटीत गुन्हेगारीचे प्रकार आढळून आल्यास त्याविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व त्यांचा विघातक कृत्यांना आळा घालणेबाबत अधिनियम (M.P.D.A) 1981 अन्वये कारवाई करण्याची तरतूद आहे.
          अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यात येत असून यापुढे अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर अधिक परिणामकारक कारवाई  करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले आहेत.
*-*-*-*-*-*-*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा