बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९


महाराष्ट्राच्या यशात बीडचा मोठा वाटा
जलसाठ्यांच्या पुनरुत्थानात बीड जिल्हा देशात प्रथम

        बीड,दि,19 :- जलसंधारणामध्ये केलेल्या चांगल्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याने राष्ट्रीय पुरस्कार 2018 मध्ये मानाचे स्थान मिळविले असून बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा उचलत जलसाठ्यांचे पुनरुत्थान कामामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
           राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली असून याची माहिती क्षेत्रीय निदेशक केंद्रीय भूमिजल बोर्डाच्यावतीने देण्यात आली. पुरस्कारांचे वितरण 25 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलसंपदा, भूपृष्ठ वाहतूक, जहाज  बांधणी व गंगा पुनरुत्थान मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते होणार असून यावेळी बीड जिल्ह्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी श्री एम. डी. सिंह यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
           बीड जिल्ह्याला मिळालेल्या यशामध्ये  जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामविकास मंत्री  पंकजाताई मुंडे  यांचे कुशल मार्गदर्शन  व प्रयत्न  महत्त्वाचे ठरले आहेत. हे यश मिळविल्याचा आनंद जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी व्यक्त केला आहे. जलसाठ्याच्या पुनर्भरणासाठी शासकीय विभाग व यंत्रणांनी केलेल्या कामात  सातत्यपूर्ण प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग असून यासाठी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
         जलसाठ्यांचे पुनरुत्थान कामात यश मिळविताना जिल्हा प्रशासनाने यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. संबंधित यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, नियमित बैठका व सातत्याने पाठपुरावा करून कामे पूर्ण करण्यात आली. यासाठी सोशल मीडिया व माहिती तंत्रज्ञानाचाही आवश्यक तो  वापर करण्यात आला.
           राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये स्थान मिळविणारे राज्यातील जिल्हे व संस्था यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
सर्वोत्कृष्ट राज्य- महाराष्ट्र प्रथम पुरस्कार
          उत्कृष्ट काम करणारे जिल्हे म्हणून यात भूजल पुनर्भरण- अहमदनगर प्रथम पुरस्कार, नदीचे पुनरुत्थान - लातूर प्रथम आणि वर्धा द्वितीय पुरस्कार, जलाशयांचे पुनरुत्थान -बीड जिल्ह्याने प्रथम पुरस्कार मिळविला आहे.
उत्कृष्ट  ग्रामपंचायत मैड जि .सोलापूर
          उत्कृष्ट संशोधन व नवकल्पनेसाठी सदभावना ग्रामीण  विकास संस्था, वर्धा तिसरा पुरस्कार, पाण्याच्या संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम टीव्ही शो- जनता दरबार प्रथम पुरस्कार, जल संरक्षण सर्वोत्तम विद्यालय - एस सी गर्ल स्कूल निलंगा द्वितीय पुरस्कार , उत्कृष्ट वृत्तपत्र महाराष्ट्र -सिंचन विकास प्रथम पुरस्कार व लोकमत मीडिया द्वितीय पुरस्कार, बेस्ट वॉटर रेग्युलरिटी अथॉरिटीचा एमडब्ल्यूआरआरए संस्थेस प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
*-*-*-*-*-*-*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा