बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्हयातील खाजगी बसेस व वाहने अधिग्रहित करण्याचे आदेश


          बीड दि.18:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे प्रवाशी मार्गावर मानव निर्मित आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी वेळेत व सुरक्षित प्रवास करण्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त झालेल्या अधिकारानुसार प्रवाशी वाहतुकीमधील मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी व सक्षम प्रतिसादासाठी वरील अधिनियमातील कलम 65 (सी) नुसार पुढील अटी व शर्तीवर खाजगी बसेस व वाहने अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम.डी. सिंह यांनी दिले आहेत.
            या आदेशप्रमाणे संबंधित तहसिलदार प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड, अंबाजोगाई व विभाग नियंत्रक महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, बीड यांना वाहतूक व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हयातील सर्व बस स्थानकांमधून प्रवाशी वाहतुकीसाठी खाजगी वाहनधारकांना संप मिटेपर्यंत प्रवाशी वाहतुक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

            राज्य परिवहन महामंडळाच्या दरानुसार प्रवाशांकडून दर आकारणी करण्याचे खाजगी बसधारकांना परवानगी देण्यात आली आहे.  महामंडळाच्या निश्चित दरांपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारण्यास मनाई करण्यात आली असून वाहन चालकाचे मानधन, इंधन व इतर खर्च खाजगी वाहनधारकाने स्वत: करावयाचे आहे.  शासनाकडून कोणतेही अनुदान, निधी उपलब्ध करुन देण्यात येणार नाही.  खाजगी वाहनधारकांनी  प्रवाशाच्या सुरक्षेसाठी नियम पाळणे बंधनकारक राहील. अधिग्रहीत खाजगी वाहनावर दगडफेक करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-या व्यक्ती विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 56 अन्वये कारवाई करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड, अंबाजोगाई व विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, बीड यांना देण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक , बीड यांनी राज्य  परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. डी. सिंह यांनी  दिले आहेत.                                 -*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा