मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम

विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम
                                       - मिलिंद तुपसमिंद्रे
                                       जिल्हा माहिती कार्यालय, बीड
                            
      विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये बीड जिल्हा एक आहे. बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. 7 ऑक्टोबरपासून पुढील चार महिन्यापर्यंत मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही माहिती...

       विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये बीड जिल्हा एक आहे. बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्धवट लसीकरण झालेली व लसीकरण न केलेली बालके ही पूर्ण लसीकरण केलेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. यासाठी केंद्र शासनाने माहे ऑक्टोबर 2017 मध्ये 187 जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य (आयएमआय) कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या अहवालानूसार जिल्ह्यात पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण 65 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्याने ही  मोहीम निवड केलेल्या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये ऑक्टोबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत 4 मोहिमेअंतर्गत नियोजन करण्यात आले आहे.
विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची उद्दिष्टे
          नियमित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण संरक्षित बालकांचे प्रमाण डिसेंबर 2018 पर्यंत विशेष मिशन इंद्रधनुष्य  मोहिमेसाठी निवडलेल्या जिल्ह्यामध्ये 90 टक्के झाले पाहिजे. प्रत्येक बालक पूर्ण संरक्षित होण्यासाठी राजकीय, प्रशासकीय, आर्थिक विभाग व इतर विभागांचा सक्रीय सहभाग घेण्यात येणार आहे. वय वर्षे 0 ते 2 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला ड्युलिस्टप्रमाणे लसीकरण केले गेले पाहीजे. अशी या विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.
विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्याबाबत धोरण
          विशेष लसीकरण सत्र हे निवडण्यात आलेल्या 9 जिल्ह्यात व 13 महापालिका क्षेत्रात 7 दिवस कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी राबविण्यात येणार आहे. यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. विशेष लसीकरण सत्राच्या ठिकाणी लाभार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी बालकांना बोलावण्यासाठी मोबिलायझरची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी घटक व इतर विभागांची मदत सुध्दा या कामी घेण्यात आली आहे.
विशेष मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमाचे नियोजन
          जोखीमग्रस्त भागांची निवड करण्यात येऊन त्या भागात लसीकरण सर्वेक्षण करण्यात आले आहे व ज्या ठिकाणी खरोखरच विशेष मिशन इंद्रधनुष्य राबविण्याची गरज आहे अशा जोखीमग्रस्त भागांची निवड करुन तेथे  आरोग्य सेवा सत्राचे नियोजन करण्यात आले आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये मोबाईल टिमचे आयोजन करण्यात येणार आहे.
जोखीमग्रस्त भागांची निवड
          लसीकरणाचे कमी काम असणारा भाग,  घटसर्प व गोवर आणि धर्नुवाताचा उद्रेक झालेला जोखीमग्रस्त भाग, अति दुर्गम भाग, डोंगराळ भाग तसेच अशी गावे आणि विभाग जेथे सलग तीन सत्रे रद्द झाली आहेत. एएनएमची पदे रिक्त असलेल्या उपकेंद्रांची गावे, शहरी भागातील झोपडपट्टी, पल्स पोलिओ कार्यक्रमात जोखीमग्रस्त असलेला भाग. विटभट्टी, बांधकामे, स्थलांतरीत वस्त्या, उस तोडणी वस्त्या आणि इतर पेरीअर्बन एरिया या निकषानूसार जोखीमग्रस्त भागांची निवड करण्यात येणार आहे. निवड केलेल्या जोखीमग्रस्त भागातील 0 ते 2 वर्षे वयोगटातील असंरक्षित बालकांची व असंरक्षित गरोदर मातांची नोंद करण्यात येऊन त्यानूसार यादी तयार करण्यात आले आहे.        
विशेष इंद्रधनुष्य मोहिमेचे नियोजन व पूर्व तयारी
          जिल्हास्तरीय जिल्हा समन्वय समिती सभा दि.16 ऑगस्ट 2017 रोजी घेण्यात आली आहे. जिल्हास्तरीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक,  वैद्यकीय अधिकारी यांची कार्यशाळा दि.19 ऑगस्ट रोजी घेण्यात आली असून जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. व्दितीय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, गटप्रवर्तक यांची दि.21 ऑगस्ट रोजी कार्यशाळा घेण्यात आली आहे. जिल्हास्तरीय अधिकारी व जिल्हास्तरीय पर्यवेक्षकांची दि.24 ऑगस्ट रोजी कार्यशाळा संपन्न झाली. तालुकास्तरावर दि.22 ते 30 ऑगस्ट या कालावधीत कार्यशाळा घेण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर दि. 22 ते 30 ऑगस्ट या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले. निवड करण्यात आलेल्या अति जोखमीच्या गावांचे दि.4 ते 15 सप्टेंबर 2017 या कालावधीत प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. निवडलेली अति जोखमीची गावे 221 ग्रामीण तर 74 शहरी असे एकुण 295 गावांची निवड करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची यादी व सत्राचे नियोजन दि.18 सप्टेंबर 2017 पर्यंत पूर्ण करण्यात आले.विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत ब्रीज प्रशिक्षण कार्यशाळा दि.13 सप्टेंबर 2017 रोजी घेण्यात आली तसेच विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत तालुकास्तरीय ब्रीज प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रमाणे मोहिमेचे नियोजन व पूर्वतयारी करण्यात आली आहे.
          बीड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मागील 3 इंद्रधनुष्य मोहिमेमध्ये प्रत्येकी 4 प्रती टप्प्याप्रमाणे एकुण 12 फेऱ्या घेण्यात आल्या असून त्यामध्ये एकुण 3 हजार 11 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आली होती. यामध्ये  20 हजार 420 बालकांना व 3 हजार 132 गरोदर मातांना लसीकरण करण्यात आले होते. मिशन इंद्रधनुष्य मोहीम ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या चार टप्प्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी  आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा