गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचे आवाहन शेतकऱ्यांनी हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा



बीड, दि. 26 :- प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत राज्यात पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार 2017-18 बजाज अलायन्झ जनरल इन्शुरंस कंपनीमार्फत बीड जिल्ह्यात डाळींब, मोसंबी, पेरु, केळी, संत्रा, आंबा व लिंबु या फळपिकाकरीता राबविण्यात येत आहे. तरी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
डाळींब, मोसंबी, पेरु व केळी या फळपिकांचा विमा हप्ता उरतविण्याची अंतिम तारीख दि.31 ऑक्टोबर 2017 आहे. लिंबु फळपिकासाठी दि.14 नोव्हेंबर 2017, संत्रा फळपिकासाठी दि.30 नोव्हेंबर तर आंबा फळपिकासाठी दि.31 डिसेंबर 2017 ही अंतिम तारीख आहे.
कमी अथवा जास्त  पाऊस, वारा, तापमान, अवेळी पाऊस, सापेक्ष आर्द्रता व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे. फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखणे ही योजनेची वैशिष्टे आहेत. ही योजना बजाज अलायन्झ जनरल इन्सुरंन्स कंपनीमार्फत बीड जिल्ह्यात डाळींब, मोसंबी, पेरु, केळी, संत्रा, आंबा व लिंबु या फळपिकाकरीता राबविण्यात येत आहे. वित्तीय संस्थाकडे पिक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्याची अधिसुचित फळपिकासाठी पिक कर्ज मर्यादा मंजूर आहे अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक राहील. या योजनेत विमा संरक्षीत रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम फळपिक निहाय राहील. या योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बँकेशिवाय कॉमन सर्विस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रामार्फतही विमा अर्ज व विमा हप्ता भरण्याची सुविधा दिलेली आहे. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आधार कार्ड किंवा आधार नोंदणी पावती अनिवार्य केली आहे. सर्व बँकांनी फळपिक विमा भरण्याकरीता आलेल्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरुन घ्यावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा