शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाअंतर्गत बदल अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष अभियानाचे आयोजन


            बीड, दि. 31 :-  सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बीड अंतर्गत प्रलंबित असलेले बदल अर्ज (Change Report) जलदगतीने निकाली काढण्यासाठी मा. धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 15 डिसेंबर 2016 रोजीच्या परिपत्रकान्वये दिनांक 1 ते 31 जानेवारी 2017 या कालावधीत विशेष अभियान आयोजित करण्यात आलेले आहे. या विशेष अभियानामध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त -1 यांच्याकडे 340 व सहाय्यक धर्मदाय आयुक्त-2  यांच्याकडे 280 अशी एकूण 620 प्रकरणे विशेष अभियानामध्ये ठेवलेली आहेत. तरी सर्व संबंधित विश्वस्तांनी व विधीज्ञांनी सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून प्रकरणातील आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन त्यांचे बदल अर्ज निकाली काढण्यासाठी सहाकार्य करुन या विशेष अभियानास सहकार्य करावे.
            ज्या सार्वजनिक न्यासांनी / संस्थांनी त्यांच्या न्यासांची / संस्थांची हिशोबपत्रके व बदल अर्ज गेल्या 5 वर्षात किंवा त्यापुर्वी सादर केले नसतील तसेच त्या संस्था व न्यास अकार्यरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द त्या संस्थांची / न्यासांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही या कालावधीत सुरु करण्यात येत आहे. तरी ज्या अकार्यरत असलेल्या विश्वस्त संस्थांना त्यांची नोंदणी रद्द करावयाची आहे अशा संस्थांनीही अर्ज सादर करावेत.
            बदल अर्जाच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन नवीन बदल अर्ज सादर केलेले तर ते 30 दिवसांत निकाली होऊ शकतील. तरी नवीन अर्ज परिपूर्ण बदल अर्ज सार्वजनिक न्यास नोंदणी, बीड या कार्यालयास सादर करावेत. तसेच या अभियानाबाबत बिगरवाद प्रकरणातील पक्षकार, विधीज्ञ व सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी तसेच या अभियानाचा लाभ घ्यावा असे बीडचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी कळविले आहे.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा