सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा फसव्या जाहिरातींना बळी न पडता ग्राहकांनी जागरुकता बाळगावी -निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी


        

बीड, दि. 26 :- ग्लोबलायझेशनमुळे सेवा आणि वस्तुच्या बाजारपेठेत मोठया प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आहे. जाहिरातीच्या माध्यमातून वस्तू विक्रीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे ग्राहकांची फसवणुकीचे प्रमाण वाढण्याची शक्यता  वाढली असल्याने ग्राहकांनी फसव्या जाहिरातींना बळी न पडता खरेदी विक्रीचे व्यवहार करताना जागरुक राहवे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            यावेळी बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष के.एन.तुंगार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.आर.टी. गर्जे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत, तहसीलदार छाया पवार, श्री. चित्ते, शैलजा सेलमोहेकर, ॲड. नरेंद्र कुलकर्णी, जनार्दन मुंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी म्हणाले की, पुर्वी बारा बलुतेदारी पध्दतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असत. मागणी आणि पुरवठा यांच्यातील व्यस्त प्रमाणामुळे काही सेवा आणि वस्तुंचे वाढीव मुल्य द्यावे लागल्याने चलन निर्माण झाले. बदलत्या काळानुसार विविध प्रकारच्या सेवा आणि वस्तु उपलब्ध झाल्याने बाजारपेठेत स्पर्धा निर्माण झाली. ग्राहकाला पैशांच्या बदल्यात वस्तु व सेवा मिळण्यास सुरुवात झाली. मात्र यामध्ये फसवणुकीचे प्रकारही वाढले आणि यातुनच ग्राहक हक्क संरक्षणाची संकल्पना समोर आली असेही श्री. सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
            ग्राहकाला त्याच्या पैशाच्या मोबदल्यात योग्य दराने आणि दर्जेदार सेवा किंवा वस्तु पुरविणे अपेक्षीत असते. परंतु असे न झाल्याने ग्राहकाच्या हक्कांची पायमल्ली होते. त्यामुळे ग्राहकांनी सजग राहून खरेदी करावी आणि फसव्या जाहिरातींना बळी पडु नये. ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ग्राहक न्यायालय आणि ग्राहक हक्क मंचांची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच शासन आणि प्रशासनही विविध माध्यमातून ग्राहक हक्क संरक्षणाचे काम करीत आहे. त्यामुळे फसवणुक झाल्याची लक्षात आल्यास ग्राहकांनी ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रारी दाखल कराव्यात. तसेच ग्राहकांचे काय हक्क आहेत याबाबत व्यापक जनजागृती करावी असे आवाहनही श्री. सुर्यवंशी यांनी यावेळी केले.
            यावेळी बोलताना बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष के.एन.तुंगार म्हणाले की, जो सेवा देतो तो ग्राहक असतो. वस्तु आणि सेवा यांच्या फायद्या बाबत माहिती नसल्याने ग्राहकाची फसवणुक होते आणि त्यातून वाद निर्माण होतात. यासाठी ग्राहक हक्काची सर्वांना परिपुर्ण माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी या कायद्याची तळागाळापर्यंत जनजागृती करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्रुटीयुक्त किंवा सदोष सेवा मिळाल्यास ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी पुढाकार घेतल्यास ग्राहक हक्क चळवळ अधिक गतीमान होण्यास मदत होईल असेही श्री. तुंगार यावेळी म्हणाले.
            यावेळी ॲड. नरेंद्र कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष प्रा. आर.टी. गर्जे, जनार्दन मुंडे आणि यशवंत काशिद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार छाया पवार यांनी त्यांच्या प्रास्ताविकात ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक न्यायालय अणि ग्राहक मंच याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी बिंदु माधव जोशी पुरस्कार प्राप्त नामदेव श्रीपतराव हेडे यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ग्राहक जनजागृतीसाठी विविध माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा पुरवठा विभागाचे एम.व्ही. काळे यांनी केले तर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत यांनी आभार मानले. या कार्यक्रमास नायब तहसीलदार श्री.आव्हाड, श्री. ढाकणे, श्री. मंदे, श्रीमती परवीन पठाण, यांच्यासह जिल्हयातील विक्रेते, ग्राहक, जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा