बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री ना. पंकजा मुंडे








            बीड, दि.22 :-  जिल्हयाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकासाची कामे हाती घेण्यात आली असून विविध विकासाची कामे विकासपर्वाच्या माध्यमातून परळी मतदारसंघात राबविण्यात येत आहेत. ही विकासाची गंगा सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी केले.
            पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी, उजनी, पट्टीवडगाव,चंदनवाडी, हातोला, तळेगाव आदी ठिकाणीच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमीपूजन आणि शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
            यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गावांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे. ग्रामविकासामध्ये रस्त्याचे अनन्यसाधारण महत्व  आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्याबरोबरच बीड जिल्हयातही पक्क्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहेत.  मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत परळी मतदारसंघात विशेष बाब म्हणून जास्त लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत असे सांगुन  या रस्त्यामुळे दळणवळण सुलभ व जलदगतीने होणार असल्याने परळी मतदारसंघाच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. तसेच सन 2018 पर्यंत रस्त्याचे एकही काम प्रलंबित राहणार नाही असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
            जिल्हयातील रस्त्यांसह शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावरही भर देण्यात येत असून या सर्व योजनांच्या माध्यमातून ग्राम विकासाचा मार्ग सुकर होणार आहे.  जलयुक्त शिवार योजनेच्या यशस्वीतेमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे तसेच चालू वर्षात परळी मतदारसंघात मोठयाप्रमाणात  बंधाऱ्यास  मंजूरी देण्यात आली असल्यासने पाण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे.  शेतकऱ्यांना योग्य दाबाने आणि नियमित विद्युत पुरवठा करण्यासाठी नवीन विद्युत उपकेंद्रे, ट्रांसफार्मर आदी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच इंदिरा आवास योजना, संजय गांधी निराधार  योजना आदी विशेष सहाय्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देऊन त्यांचेही जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ना.मुंडे म्हणाल्या की, स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्या हयातीत त्यांनी परळी मतदारसंघाच्या विकासासाठी विविध महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवून शेतकरी कष्टकरी जनतेला सुखी समाधानी करण्याचे त्यांचे स्वप्न्‍ा होते. ते अपूर्ण राहिलेले स्वप्न आपण पूर्ण करणार असून त्यादृष्टीने काम करीत असल्याचे सांगून त्यांनी सर्व गावांना व ग्रामस्थांना आपल्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी नेमाजी देशमुख, श्री.गिरी महाराज, गौतम नागरगोजे, गणेश कराड, बाबुराव वाकडे, गुणाजी लव्हारे, बिभीषण फड, विलास जगताप, बळी गर्जे, नारायण तारसे, दिलीप मुंडे, वसंत मुंडे, साहेबराव गायकवाड, श्रीमती उज्वला मुंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी.व्ही.निला, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार शरद झाडके, गटविकास अधिकारी डी.बी. गिरी  यांच्यासह जोडवाडी, उजनी, पट्टीवडगाव परिसरातील पदाधिकारी, नागरिक यांची उपस्थिती होती.
                                                                   विकास कामांचा शुभारंभ

            पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विकासपर्व दौऱ्यात जोडवाडी येथील गावांतर्गत 3 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता व नाली बांधकाम तसेच जोडवाडी मंदिरासमोर 3 लाख रुपये खर्चुन पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन तसेच प्रवासी निवाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले.           उजनी येथे 54.71 लाख खर्चाच्या निरपणा-उजनी रस्त्याची सुधारणा करणे  याकामाचे भूमीपुजन करण्यात आले, पट्टीवडगाव येथे 4 लाख रुपये खर्चून सामाजिक सभागृहाचे बांधकाम, 3 लाख रुपये खर्चाच्या मुस्लीम स्मशानभूमी बांधकाम, पट्टीवडगाव अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम खर्च रु. 3 लाख आणि वॉर्ड क्र. 1 मधील 3 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. यासोबतच चंदनवाडी, हातोला, तळेगाव येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा