शनिवार, ८ एप्रिल, २०१७

सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानामुळे भारताची महासत्ता होण्याकडे वाटचाल - निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी





सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानामुळे
भारताची महासत्ता होण्याकडे वाटचाल
                     - निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी

        बीड, दि. 8 :-  देशाच्या विकासाचे प्रतिक भौतिक विकास नसून देशाचे समाजस्वास्थ कसे आहे यावर अवलंबुन असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि अस्पृश्य समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानामुळे भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत आहे असे  प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.
            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने आयोजित सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
            यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त रविंद्र शिंदे, धर्मराज करपे, अ.रा. देवगावकर, श्री. सराफ, जिल्हा माहिती कार्यालयाचे ना.गो. पुठ्ठेवाड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनाच्या प्रत्येक अंगाचा समावेश संविधानामध्ये केला आहे. दलित आणि अस्पृश्य समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून दिला. यासाठी त्यांना समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरा यांचा विरोध करावा लागला. चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि काळाराम मंदीर प्रवेश ही त्याची उहादरणे असल्याचे श्री. सुर्यवंशी यांनी यावेळी नमुद केले.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर विविध ग्रंथ आणि पुस्तकांच्या वाचनाचा प्रभाव असल्याने समाजाचे मागासलेपण हे अज्ञानामुळे आहे हे ओळखून त्यांनी शिक्षणाचे महत्व  समाजाला पटवून दिले. तसेच  डॉ. आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दलित आणि वंचित समाजाला दिला.
            दलित समाजाला समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे आणि त्यांना समानता मिळावी यासाठी कायदेमंडळामध्ये दलित व्यक्ती असणे डॉ. आंबेडकरांना अपेक्षीत होते. त्यासाठी त्यांनी त्यावेळी कायदेमंडळामध्ये राखीव मतदार संघाची मागणी लावून धरली होती. शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा लाभ उपेक्षित समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविल्यास त्यांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती होण्यास मदत होईल असेही श्री. सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
            कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक धर्मराज करपे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामधील सर्वात उत्कृष्ट कार्य म्हणजे संविधान आहे. संविधानामुळे देशातील सर्व जाती धर्मातील लोकांना समतेचा अधिकार प्राप्त करुन दिला आहे असेही ते म्हणाले. श्री. करपे यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रभाव टाकरणाऱ्या व्यक्ती, त्यांचे जीवन चरित्र, त्यांच्या जडणघडणीमध्ये योगदान देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सविस्तरपणे माहिती करुन दिली.

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समाज कल्याण सहायक आयुक्त रविंद्र शिंदे यांनी दि. 8 ते 14 एप्रिल या सामाजिक समता सप्ताहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अस्मिता जावळे यांनी केले तर आभार श्री. बारगजे यांनी मानले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा