बीड, दि. 10 :- अद्ययावत यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाच्या
सहाय्याने भूमी अभिलेख विभागाने तंत्रशुध्द व अचुक भूमापन केल्यास पुर्नमोजणी आणि न्यायालयीन
प्रकरणे टाळण्याबरोबरच जमीन मोजणी प्रकरणातील लाभार्थ्यांची जमीन मोजणीची प्रकरणे निघण्यास
निश्चितच मदत होईल असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी केले.
जागतिक
भूमापन दिनानिमित्त बीडच्या भूमी अभिलेख विभागामार्फत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या
सभागृहामध्ये जिल्हास्तरीय भूमापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा
शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात
ते बोलत होते.
यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार
छाया पवार, तहसीलदार चौरे, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक डॉ. विजय वीर, एन.आय.सी.चे
सुनिल खुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
पुढे बोलताना अप्पर जिल्हाधिकारी गगराणी म्हणाले की, शासनाने भूमी अभिलेख विभागाला
ई.टी.एस., प्लॉटर, प्रिंटर या सारख्या अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध करुन दिलेल्या
आहेत. तसेच या यंत्रसामुग्री वापरण्याचे तंत्रशुध्द प्रशिक्षणही दिले आहे. या प्रशिक्षणाचा
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपयोग करुन भूमापनातील उणीवा दूर करुन अचुक भूमापन करावे.
जेणे करुन पुर्नमोजणी किंवा न्यायालयीन प्रकरणांना सामोरे जावे लागणार नाही. यासाठी
अधिक्ष दक्षता घ्यावी असे सांगून भूमी अभिलेख विभागाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी
मार्गदर्शन करताना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यंवंशी म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये
नगर-बीड-परळी आणि राष्ट्रीय महामार्ग यासोबत इतर प्रकल्पांसाठी मोठया प्रमाणात भूसंपादन
करण्यात आले आहे. या भूसंपादनाच्या कामी भूमी अभिलेख विभागाने भूमापनाची यशस्वीरित्या
पार पाडलेली जबाबदारी निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. यासोबत ज्या ठिकाणचे सिटी सर्व्हे
होऊन पीआर कार्ड दिल्या गेले आहेत अशा ठिकाणचे सातबारा देणे बंद करणे, दशमान पध्दतीचा
अवलंब करणे आणि अभिलेखाचे स्कॅनिंग करणे आदी महत्वाची कामे लवकरात लवकर पूण करावीत
असे सांगितले.
जिल्हा
अधिक्षक डॉ. विजय वीर यांनी प्रास्ताविकात
भूमी अभिलेख विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती देऊन मान्यवरांचे स्वागत
केले. तर भूमापक एल.एम. पांचाळ यांनी ऐतिहासिक काळातील भूमापन पध्दती, स्वातंत्र्योत्तर
व स्वातंत्र्यानंतरची भूमापन पध्दती नियम व कायदे यासह तुकडेबंदी आणि एकत्रिकरण याबाबींविषयी
सविस्तर माहिती दिली.
यावेळी
पोट हिस्सा मोजणी, हद्द कायम आणि इतर मोजणीच्या कामांमध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल
प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी
यावेळी इ.टी.ए. मोजणी, प्लेन टेबल मोजणीच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन सुनिल बागुल यांनी केले तर आभार एल.एम. पांचाळ यांनी मानले. या कार्यक्रमास
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, तालुका
भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा