सोमवार, १० एप्रिल, २०१७

बीड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हेच ध्येय - पालकमंत्री पंकजा मुंडे







       बीड, दि. 10 :- बीड जिल्ह्याच्या विकासाचे पाहिलेले कै. गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
          अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय आणि अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रशासकी इमारतीचे उदघाटन ना. मुंडे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार आर.टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, नगराध्यक्षा रचना मोदी, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाल्या की राज्यातील शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी           कै. गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या कामगिरीची आठवण अजुनही महाराष्ट्राला आहे. विशेषत: मुंबईसह राज्यातील गुन्हेगारांविरुध्द केलेली कडक कारवाई आणि घातलेला पायबंद विसरता येणार नाही. त्यांच्या दुरदृष्टीच्या उपाययोजना नेहमी स्मरणात राहतील अशा असल्याचे सांगून श्रीमती मुंडे यांनी पोलीस दलाचे मनोबल उंचावण्याचे काम आजही शासन करीत असल्याचे स्पष्ट केले. शासन-प्रशासन एकमेकांच्या हातात हात घालून काम करणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही हे सुत्र लक्षात घेऊन पोलीस दलाने काम करावे. शासन पोलीस दलाला सक्षम करण्यावर तसेच मुलभूत सेवा सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष देत असल्याचेही त्या म्हणाल्या.
          बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून जवळपास 4600 कोटी रुपयांचा निधी येत्या 2019 पर्यंत मिळणार आहे. या रस्ते विकासाच्या कामामुळे दळणवळणाची साधने समृध्द होणार आहेत. जिल्ह्यातील रेल्वेमार्गाच्या कामालाही गती मिळाली असून लवकरच काम पूर्ण होणार आहे. यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे असेही ना. मुंडे यांनी यावेळी सांगितले. पोलीस  दलाच्या या नवीन इमारतीमधून पिडितांना न्याय मिळेल आणि पोलीस दलाचा सकारात्मक धाक कायम राहिल अशी अपेक्षा व्यक्त करुन ना. मुंडे यांनी पोलीस दलाने जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह आणि विशेष कक्ष स्थापन केल्याबद्दल पोलीस दलाचे विशेष कौतुक केले.
          यावेळी ना. मुंडे यांच्या हस्ते पोलीस दलाच्या महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रम तसेच महिलांविषयक कायद्यांची माहिती देणाऱ्या ' स्वयंसिध्दा ' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी आपल्या भाषणात पोलीस दलाच्या मुलभूत सेवा-सुविधांच्या कामांची माहिती देत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या प्रश्नांविषयी लक्ष वेधले. पोलीस अधिक्षक        जी. श्रीधर यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील पोलीस दलाच्या नवीन प्रशासकीय इमारती, आय.एस.ओ. मानांकनाची कार्यवाही तसेच सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाची माहिती दिली.

          या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी, अप्पर पोलीस अधिक्षक हरी बालाजी, सहाय्यक पोलीस अधिक्षक विशाल आनंद, फुलचंद कराड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  पाटील आदि मान्यवर पोलीस अधिकारी  कर्मचारी तसेच प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा