बीड, दि. 7 :- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर
जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमाची व प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करावी असे आवाहन
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
जिल्ह्यात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर
करावयाच्या उपाययोनासंबंधी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा)
अधिनियम-1995 आणि प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा-1960 चे उल्लंघन होत असल्यास किंवा
गोवंशाची कत्तल अथवा वाहतुक होत असल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशन, पोलीस नियंत्रण
कक्ष किंवा पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करुन जिल्हाधिकारी
राम पुढे म्हणाले की, बकरी ईदनिमित्त शहरात 12,13 आणि 14 सप्टेंबर रोजी तात्पुरत्या
स्वरुपातील कत्तलखाना सुरु केला जाणार आहे.यासाठी नगरपालिका, पोलीस विभाग व पशुसंवर्धन विभागात समन्वय साधला जात आहे. नगरपालिकेने
कत्तलखान्याची जागा ठरवून द्यावी त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. पशुवैद्यकीय
अधिकाऱ्यांनी कत्तलपूर्व प्रमाणपत्र द्यावे. इतर कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याची
दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात कत्तल करावयाची असल्यास संबंधित ग्रामपंचायतीचा प्रस्ताव
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावा लागेल. बकरी ईद सण
जिल्ह्यात शांततेने साजरा केला जाईल यासाठी सर्व विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करावी
अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी राम यांनी सर्व अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना केल्या.
प्रारंभी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.
सुरेखा माने यांनी महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम-1995 मधील तरतूदी स्पष्ट करुन सविस्तर माहिती दिली.
पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर म्हणाले की,
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवावा व
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता
घ्यावी. कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधावा. पोलीस अधिकाऱ्यांनी
कत्तलखान्यासंबंधी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क ठेवावा असेही ते म्हणाले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
धनराज निला, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल तुंबारे, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन)
डॉ. शैलेश केंडे, डॉ. डी.बी. मोरे, सर्व पोलीस अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी,
पशुसंवर्धन अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा