मंगळवार, २६ जुलै, २०१६

तंबाखुच्या व्यसनापासून दूर रहा - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोल्डे

          बीड -  तंबाखु व तंबाखुजन्य इतर पदार्थांच्या व्यसनामुळे मानवाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तंबाखुच्या व्यसनापासून नागरिकांनी दूर रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांनी केले.
            राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समिती आणि जिल्हा रुग्णालय बीड यांच्यावतीने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तंबाखु नियंत्रणाविषयी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            तंबाखुच्या व्यसनामुळे कर्करोग सारख्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तंबाखुच्या व्यसनामुळे रक्त वाहिन्या बंद पडतात, रक्तदाब वाढतो. यामुळे दम लागणे, घाम येणे, थकवा येणे, जड अवघड कामे न होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे शरीरातील आतड्यांचे काम बंद होते. तंबाखुतील निकोटिन हा द्रव पदार्थ शरीराला अपायकारक असून सर्वांनी योग्य दक्षता घेतली तर या व्यसनापासून मुक्त होता येते. या व्यसनापासून होणाऱ्या भयानक परिणामांची सर्वांनी जनजागृती करावी व आपल्या आसपासच्या लोकांमध्ये या विषयी माहिती द्यावी असे आवाहनही डॉ.बोल्डे यांनी यावेळी केले. त्यांनी सादरीकरणाद्वारे कार्यशाळेत तंबाखु नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती दिली.
            राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून तंबाखु सेवनाचे आरोग्यावरील दुष्परीणाम व तंबाखू नियंत्रण कायद्याविषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे उद्दीष्ट आहे. तंबाखु नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे व शाळा-महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून जनजागृती करणे व विविध विभागामध्ये समन्वय करणे यासारखी उद्दीष्ट्ये समोर ठेवून समिती बीड जिल्ह्यात कार्यरत आहे.याचाच एक भाग म्हणून तंबाखू नियंत्रणाविषयी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेस सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र तंबाखु नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या ठिकाणी तंबाखु नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. तंबाखुमुळे झालेल्या आजारावर याठिकाणी उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून या शिवाय तंबाखु व्यसन सोडण्यासाठी सुध्दा मदत केली जात आहे. अशी माहितीही या कार्यशाळेत देण्यात आली.
            जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यावेळी म्हणाले की, तंबाखु खाणाऱ्यांना तंबाखु सोडण्यासाठी प्रवृत्त करणे हे एक मोठे कार्य आहे. या कार्यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आजुबाजुच्या समाजात तंबाखु व्यसनामध्ये अडकलेल्या अनेक लोकांचा वावर दिसून येतो. त्यांच्यामुळे शहराची-परिसराची व इमारतीची स्वच्छता धोक्यात येते. या अनिष्ठ पध्दतीमुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येत आहे. व्यसनापासून दूर राहणे हाच एकमेव यावर उपाय आहे. असेही ते म्हणाले.
            या कार्यशाळेत तंबाखु नियंत्रणाबाबत दृकश्राव्य चित्रफित आणि पावरपॉईंट सादरीकरण दाखविण्यात आले. या कार्यशाळेस निवासी आरोग्य अधिकारी डॉ. दबडगावकर, सुदाम मोगले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सुत्रसंचालन श्रीमती रमा गिरी यांनी केले तर शेवटी डॉ. हरदास यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा